लिफ्टची मागणी करुन चोरट्याने तरुणावर केले वार, मोबाईल व रोख रक्कम घेवून झाला पसार; साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 04:27 PM2022-02-18T16:27:08+5:302022-02-18T16:27:27+5:30
याबाबत कोणालाही सांगितल्यास तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही अशीही दिली धमकी
सातारा : लिफ्टची मागणी करुन चोरट्याने एका तरुणावर चाकूने वार केला. या हल्ल्यात तरुण जखमी झाला. श्रीतेज लक्ष्मण पवार (वय २१) असे या जखमी तरुणाचे नाव आहे. चोरट्याने श्रीतेज त्याच्या हातातील मोबाईल, रोख रक्कम घेवून पलायन केले. बोगदा ते सज्जनगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी (दि. ११) ही घटना घडली. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्यातील शनिवार पेठमधील श्रीतेज पवार हा बोगदा ते सज्जनगड रस्त्यावरुन निघाला होता. दरम्यान ऐश्वर्या नगरी येथील वळणावर एका चोरट्याने वाहनासमोर येत श्रीतेजकडे लिफ्टची मागणी केली. श्रीतेजची गाडी थांबताच या चोरट्याने त्याच्या मानेवर, छातीवर चाकूने वार केले.
तसेच त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. आरडाओरडा केला किंवा याबाबत कोणालाही सांगितल्यास तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन मोबाईलसह रोख ९०० रुपये घेऊन चोरट्याने तेथून पोबारा केला.
रात्रीच्या वेळी या घाटातील रस्त्यावर शुकशुकाट असतो. याचाच फायदा घेऊन चोरट्याने हे धाडस केले. दरम्यान, या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.