लोकशाहिरांची पालिकेला विसर!
By admin | Published: July 18, 2016 11:16 PM2016-07-18T23:16:21+5:302016-07-19T00:20:11+5:30
म्हणे शासकीय परिपत्रक नाही : चूक निदर्शनास आणल्यावर घातला पुतळ्यास हार
सातारा : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा सोमवारी स्मृतिदिन होता. या निमित्ताने का होईना त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे गरजेचे आहे. साताऱ्यात अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा आहे. मात्र, पालिकेला याचा विसर पडला. सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाची गाठ घेऊन चूक निदर्शनास दिली असता ‘आमच्याकडे शासकीय परिपत्रक नसल्याचे कारण सांगण्यात आले.’ शेवटी मुख्याधिकाऱ्यांनी येऊन पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
पालिकेतर्फे थोर पुरुषांची जयंती, स्मृतिदिन साजरा केला जातो. या दिवशी पुतळा परिसर स्वच्छ करून पाण्याने धुतला जातो. शहराचा प्रथम नागरिक या नात्याने नगराध्यक्ष व प्रशासकीय अधिकारी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतात.
या परंपरेची पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांना विसर पडल्याचे सोमवारी निदर्शनास आले. पुतळा परिसरात कसलीही स्वच्छता करण्यात आली नव्हती. तसेच पुष्पहार अर्पण करण्यासही कोणी आले नाही. ही बाब लक्षात आल्यावर रिपब्लिकन एम्प्लाँईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गणेश दुबळे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव मारुती बोभाटे यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना जाब विचारला. यावेळी गोरे यांनी ‘आमच्याकडे शासकीय आदेश नव्हता. आम्ही जयंती साजरी करतो,’ असे उत्तर दिले. त्यानंतर दिलगिरी व्यक्त करून अण्णा भाऊ साठे यांना पुष्पहार घालण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले.
मारुती बोभाटे, गणेश दुबळे, लेखापाल हेमंत जाधव, नगरसेवक किशोर पंडित, अभियंता सुधीर चव्हाण उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सातारा येथे सोमवारी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास स्मृतिदिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी शंकर गोरे, मारुती बोभाटे, गणेश दुबळे, लेखापाल हेमंत जाधव, नगरसेवक किशोर पंडित, अभियंता सुधीर चव्हाण उपस्थित होते.