स्टंटबाजीवर निवडून येणाऱ्यांमुळे लोकशाहीला धोका : शिवतारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:30 PM2019-05-30T13:30:10+5:302019-05-30T13:33:10+5:30
चार वर्षे ज्यांचा पत्ता नसतो, ती मंडळी केवळ स्टंटबाजी करून निवडून येतात. काम न करता त्यांना जनता निवडून देते, ही बाबच लोकशाहीला घातक आहे, अशी टीका पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केली.
सातारा : चार वर्षे ज्यांचा पत्ता नसतो, ती मंडळी केवळ स्टंटबाजी करून निवडून येतात. काम न करता त्यांना जनता निवडून देते, ही बाबच लोकशाहीला घातक आहे, अशी टीका पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केली.
जिल्हा नियोजन भवनात आयोजित केलेल्या टंचाई आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. सातारा व बारामती लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवतारे म्हणाले, शरद पवार यांचा विचार जनतेने नाकारल्याचे लोकसभा निकालावरून स्पष्ट होते. काही लोक काम न करता व चार वर्षे मतदार संघात न फिरताही त्यांना लोक निवडून देतात.
साताऱ्याचे खासदार सव्वा लाख मतांनी निवडून आले आहेत. सव्वालाख लोकांचा हा जनादेश आहे. शेवटी जनता मालक आहे. त्यांना वाटतं चालतंय, त्यात कोण काय करू शकतं? तरीही शिवसेनेच्या उमेदवाराने साडेचार लाख मते मिळवली आहेत, हे लक्षात घेण्याजोगे आहे.
पुरंदर विधानसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांना चार हजारांचे मताधिक्य मिळाल्याबाबत छेडले असता पालकमंत्री म्हणाले, भावनिक साद घालून काही लोक मते मागतात. सुळे यांना केवळ चार हजारांचे मताधिक्क्य मिळाले आहे. पुढच्या विधानसभेला चित्र उलटे दिसेल.
गोविंदा...नाच्या असून निवडून येतो
राम नाईक यांच्यासारखे समर्पित वृत्तीने काम करणारे नेते लोकसभा निवडणुकीत नाच्या असणऱ्या गोविंदाकडून पराभूत झाले होते. गोविंदाच्या विजयामुळं समाजाचं किती नुकसान झालं. हे सर्वांनाच माहिती आहे, असेही शिवतारे यांनी स्पष्ट केले.