विधानसभा निवडणुकीवर देऊरकरांचा बहिष्कार
By Admin | Published: October 6, 2014 10:05 PM2014-10-06T22:05:46+5:302014-10-06T22:41:05+5:30
२५वर्षे रखडलेल्या देऊर-बनवडी रस्त्याचा प्रश्न कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून सुटत नाही.
वाठार स्टेशन : गेली २५ वर्षे रखडलेल्या देऊर-बनवडी रस्त्याचा प्रश्न कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून सुटत नाही. या रस्त्यामुळे ग्रामस्थ, शाळकरी मुलांचे हाल होत आहे. त्यामुळे हा रस्ता होत नाही तोपर्यंत सर्वच निवडणुकांवर मतदान न करण्याचा निर्धार देऊर, भांडेवाडी ग्रामस्थांनी घेतला असून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही मतदान न करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी दिले आहे.
देऊर-बनवडी गावांना जोडणारा हा रस्ता तत्कालीन माजी आमदार शंकरराव जगताप यांनी २५ वर्षांपूर्वी खडीकरणातून पूर्ण केला होता. त्यानंतरच्या लोकप्रतिनिधी माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांनी देऊरकडून एक किलोमीटर हा रस्ता डांबरीकरण केला होता; परंतु आता हे डांबरीकरणही नाहीसे झाले असून, असणारा संपूर्ण खडीचा रस्ता जागोजागी खड्ड्यांमुळे खराब झाला आहे.
देऊरकडून वसना नदी पुलावरून बनवडी, आसनगाव, अरबवाडी, दुधनवाडी, भांडेवाडी या गावांसाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण असतानाही या रस्त्याचे काम होत नाही. यास जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधींनी याबाबत लक्ष न दिल्यानेच हा रस्ता मोडकळीस आला आहे.
याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास येणाऱ्या विधानसभेपासून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार या ग्रामस्थांनी केला आहे. या निवेदनावर रामचंद्र कदम, दिलीप कदम, बादशहा इनामदार यांच्यासह ५०० लोकांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)