कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्यास आज प्रारंभ, 'या' मार्गाने वळविण्यात आली सातारा-कोल्हापूर लेनवरील वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 12:25 PM2023-02-08T12:25:46+5:302023-02-08T12:32:54+5:30
सोमवारी कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलाखालील सर्व बोगदे वाहतुकीला बंद करण्यात आले
कऱ्हाड : येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पूल पाडण्याचा मुहूर्त अखेर ठरला. आज, बुधवारी सकाळपासूनच पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. शासकीय विश्रामगृहात मंगळवारी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबतचे नियोजन स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, बैठकीनंतर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अधिकाऱ्यांनी कोल्हापूर नाक्यावर जाऊन पाहणी केली. ढेबेवाडी फाटा येथेही त्यांनी भेट दिली. त्याठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, रयत कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील, वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज मोरे, झाकीर पठाण, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नितीन काशिद, दादासाहेब शिंगण यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पूल रविवारी पाडला जाणार होता. मात्र. मशिनरी नसल्यामुळे तसेच आवश्यक त्या उपाययोजना न झाल्यामुळे पूल पाडण्याचे काम पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर सोमवारी कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलाखालील सर्व बोगदे वाहतुकीला बंद करण्यात आले. कऱ्हाड शहरात येणारी वाहतूक पाटण तिकाटणे मार्गाने वळविण्यात आली, तर मंगळवारी आढावा बैठकीत पुढील नियोजन स्पष्ट करण्यात आले.
त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा उड्डाण पुलावरून होणारी वाहतूक बंद केली जाणार आहे, तर बुधवारी सकाळपासून पूल पाडण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती प्रोजेक्टचे प्रमुख इंजिनिअर सतेंद्राकुमार वर्मा यांनी दिली.