साताऱ्यात मोती चौकात दंगा, दगडफेक अन् नागरिकांची धावाधाव!; नेमकं काय घडलं..

By सचिन काकडे | Published: April 20, 2024 06:56 PM2024-04-20T18:56:44+5:302024-04-20T18:59:09+5:30

अचानक झालेला हा प्रकार पाहून नागरिकांमध्ये थरकाप उडाला

Demonstration of communal riot control plan by Rapid Response Team at Moti Chowk in Satara | साताऱ्यात मोती चौकात दंगा, दगडफेक अन् नागरिकांची धावाधाव!; नेमकं काय घडलं..

साताऱ्यात मोती चौकात दंगा, दगडफेक अन् नागरिकांची धावाधाव!; नेमकं काय घडलं..

सातारा : सकाळी साडेदहाची वेळ.. गर्दीने गजबजलेल्या मोती चौकात नागरिकांची ये-जा सुरू होती.. दुकानदार आपल्या कामात व्यस्त होते.. इतक्यात मोर्चेकरी आले.. घोषणा देऊ लागले.. दगडफेक सुरू झाली अन् गर्दी पांगविण्यासाठी जलद प्रतिसाद पथकाला पाचारण करावे लागले.. अश्रुधुराच्या कांड्या फोडण्यात आल्या.. अचानक झालेला हा प्रकार पाहून नागरिकांमध्ये थरकाप उडाला.. मात्र, जलद प्रतिसाद पथकाचे हे प्रात्यक्षिक असल्याचे समजल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

सातारा शहर पोलिस दलात जलद प्रतिसाद पथक स्थापन करण्यात आले आहे. भारतात अत्यंत नावाजलेल्या अशा रॅपिड ॲक्शन फोर्सकडून या पथकाला आपत्कालीन परिस्थितीत गर्दीवर कशाप्रकारे नियंत्रण आणावे, वेपन हँडलिंग याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्याने शनिवारी सकाळी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्यातील मोती चौकात जलद प्रतिसाद पथकाकडून जातीय दंगाकाबू योजनेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मोती चौकातील सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते. नागरिकांची रेलचेल सुरू होती. यावेळी अचानक काही मोर्चेकरी घोषणाबाजी करत मोती चौकात आले. त्यांना नियंत्रित करण्यासाठी जलद प्रतिसाद पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. काही वेळात दगडफेक सुरू झाली अन् गर्दी पांगविण्यासाठी पथकाला पुढाकार घ्यावा लागला. यावेळी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. अधिकाऱ्यांकडून पथकाला ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना केल्या जात होत्या.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये काही काळ थरकाप उडाला; परंतु जलद प्रतिसाद पथकाचे हे प्रात्यक्षिक असल्याचे समजल्यानंतर नागरिकांनी मोकळा श्वास घेतला. या प्रात्यक्षिकादरम्यान एक हँड ग्रेनेड व एका गॅस गन सेलचा वापर करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या सरावाची शहरात दिवसभर चर्चा सुरू होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस दलाकडून राबविण्यात येत असलेल्या अशा उपक्रमाबाबत नागरिकांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग..

पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक (गृह) अतुल सबनीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र सावंत्रे, राखीव पोलिस निरीक्षक बाळू आलदर, रॅपिड ॲक्शन फोर्सचे पोलिस निरीक्षक राजकुमार सिंह, सहायक पोलिस निरीक्षक अभिजित यादव, तीन राखीव पोलिस उपनिरीक्षक, दहा कवायत निर्देशक, ९० पोलिस अंमलदार, तसेच पाच पोलिस वाहने, जातीय दंगा काबू योजनेच्या प्रात्यक्षिकास हजर होते.

Web Title: Demonstration of communal riot control plan by Rapid Response Team at Moti Chowk in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.