संसर्गजन्य आजारात ‘डेंग्यू’चाही दंश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:42 AM2021-08-24T04:42:56+5:302021-08-24T04:42:56+5:30
कऱ्हाड : वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होत आहे. सध्या या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या ...
कऱ्हाड : वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होत आहे. सध्या या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले असून रुग्णालये गर्दीने फुलली आहेत. त्यातच डासांची पैदास वाढल्याने डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्याचे दिसते.
सध्या वातावरणात सतत बदल होत आहेत. गत काही दिवस ढगाळ वातावरण आहे, तसेच दिवसभर ऊन आणि पहाटे थंडी जाणवत आहे. गत महिन्यात पावसाने कहर केला होता. त्यानंतर वातावरण बदलले. पावसाने उघडीप दिली. दुपारी कडक ऊन पडल्यामुळे हवेत उष्णता निर्माण झाली. सध्या हे वातावरण पुन्हा बदलले असून ऊन आणि ढगाळ वातावरणाच्या खेळात वातावरणामध्ये उष्णता आणि कधी कधी गारठाही जाणवत आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असल्याची स्थिती आहे. सध्या अनेकांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यासारख्या संसर्गजन्य आजारांनी ग्रासले आहे. वातावरणातील संसर्गामुळे रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून रुग्णालये गर्दीने फुलली आहेत. किरकोळ दिसणारे हे आजार बळावू नयेत म्हणून रुग्ण तातडीने उपचार घेत आहेत.
बदलत्या वातावरणात डासांची पैदासही वाढली असून डेंग्यू, चिकुनगुनियालाही निमंत्रण मिळत आहे. गत सहा महिन्यांत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेतलेल्या डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या पन्नासपेक्षा जास्त असून खासगी रुग्णालयांमधील रुग्णांचा हाच आकडा पाचशेपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
- चौकट
सल्ल्याशिवाय औषधे नको !
सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी हे ग्रामीण भागात सर्रास होणारे आजार आहेत. त्यामुळे या आजारांकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. अनेकवेळा अशा आजारांसाठी मेडिकलमधून गोळ्या आणून त्याचे सेवन केले जाते. मात्र, परस्पर गोळ्या घेणे हे दुसऱ्या आजाराला किंवा असलेला आजार बळावण्याला कारणीभूत ठरू शकते.
- चौकट
... कशी घेता येईल घरगुती दक्षता?
१) पाणी साठवण टाक्या नियमित स्वच्छ कराव्यात.
२) घराच्या आसपास पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
३) झुडपे, अनावश्यक गवत वाढल्यास ते काढून घ्यावे.
४) घरात स्वच्छता ठेवावी. कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावावी.
५) पांघरूण स्वच्छ आणि कोरड्या जागेत ठेवावे.
६) आजारी व्यक्तीच्या संपर्कात जाणे टाळावे.
- चौकट
आरोग्य केंद्रातील रुग्ण
गाव : महिना : रुग्ण
वाठार : जानेवारी : २०
मुंढे : फेब्रुवारी : २
कोळेवाडी : एप्रिल : ६
उंब्रज : जून : २
विंग : जुलै : २२
- चौकट (फोटो : २३केआरडी०२,०३,०४)
...असे आहेत आजार
सर्दी : श्लेष्मकलेच्या तीव्र शोथाला सर्दी, पडसे असे म्हणतात. यामुळे नाकातील श्लेष्मकलेला शोफ होतो आणि ग्रंथी वाढून स्राव तयार होतो.
ताप : रक्तातल्या पांढऱ्या पेशींची रोगजंतूंविरुद्धची लढाई चालू असते. या लढाईतून निघणाऱ्या विषारी पदार्थामुळे ताप चढतो.
खोकला : खोकल्याद्वारे श्वसनमार्गातील क्षोभजनक पदार्थ, धूर, धूलिकण, प्रदूषित हवा, जंतू फुफ्फुसातून सोडलेल्या हवेच्या दाबाने बाहेर टाकले जातात.
- चौकट
घरातील साठवलेल्या स्वच्छ पाण्यात डासाची उत्पत्ती होते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा ‘ड्राय डे’ पाळावा. गत आठवड्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियाची रुग्णसंख्या जास्त होती. आरोग्य शिक्षण व प्रबोधनाद्वारे फरक पडला असून सध्या साथ आटोक्यात आली आहे.
- डॉ. राजेंद्र यादव
वैद्यकीय अधिकारी, काले
फोटो : २३केआरडी०१
कॅप्शन : प्रतिकात्मक