म्हसवडमध्ये डेंग्यू, चिकनगुनियासदृश्य साथीचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:39 AM2021-09-19T04:39:52+5:302021-09-19T04:39:52+5:30

म्हसवड : म्हसवड शहर व परिसरात काही दिवसांपासून डेंग्यू व चिकनगुनियासदृश्य साथीने थैमान घातले आहे. शहरातील विविध खासगी रुग्णालयांत ...

Dengue, Chikungunya-like epidemic in Mhaswad | म्हसवडमध्ये डेंग्यू, चिकनगुनियासदृश्य साथीचे थैमान

म्हसवडमध्ये डेंग्यू, चिकनगुनियासदृश्य साथीचे थैमान

Next

म्हसवड : म्हसवड शहर व परिसरात काही दिवसांपासून डेंग्यू व चिकनगुनियासदृश्य साथीने थैमान घातले आहे. शहरातील विविध खासगी रुग्णालयांत शेकडो रुग्ण उपचारार्थ दाखल झाले आहेत. मात्र, उशिरा का होईना, पालिका प्रशासनाला खडबडून जाग येऊन, शहरातील साथ आटोक्यात आणण्यासाठी शहरातील गल्लीबोळात औषध फवारणी करताना दिसून येत आहे.

म्हसवडकर नागरिक दीड वर्षापासून कोरोनाशी दोन हात करीत आहेत. कोरोना महामारीशी लढता लढता नागरिक मेटाकुटीला आलेले आहेत. वारंवार होणाऱ्या लॉकडाऊनमुळे शहरवासीयांचे अर्थकारण कोलमडलेले आहे. आता शहरात डेंग्यू व चिकनगुनियासदृश्य साथीने थैमान घालत शहरातील शेकडो नागरिकांना आपल्या मिठीत घेतले आहे. शहरातील जवळपास सर्वच खासगी दवाखान्यात शेकडो रुग्ण उपचार करून घेत आहेत. भयानक परिस्थिती असतानाही पालिका व आरोग्य विभागाकडून कोणतीही हालचाली दिसून येत नव्हत्या.

शहरात डासांनी अक्षरश: थैमान घातले आहे, तर शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था सांगताही येणार नाही, अशी झाली, तर शहरातील गल्लीबोळात विकासकामांच्या नावाखाली जुने डांबरी रस्ते उखडून काँक्रीटचे रस्ते व गटर्स बनविले. या रस्त्यावर पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचून डासांचे प्रमाण वाढले आहे, तसेच पाणी साठत असल्याने रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ होत आहे. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने, डासांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. शहरात अगोदरच कोरोनाचे रुग्ण दररोज सापडत असताना, आता वरील साथीसदृश्य रुग्णांचीही संख्या झपाट्याने वाढू लागल्याने, म्हसवडकर नागरिकांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. प्रशासनाने हातावर हात मारल्याने, म्हसवडकरांना कोणी वाली आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

म्हसवड पालिकेने साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाच्या साथीने त्वरित हालचाली गतिमान करून, शहरातील सर्व खासगी दवाखान्यातून सर्व्हे करून रुग्णांची नोंद ठेवणे गरजेचे बनले आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवून डास निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेणे गरजेचे बनले आहे. म्हसवड शहर व परिसरात वाढत असलेल्या साथीचा लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी आणखी कठोर पावले प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी म्हसवडकर नागरिकांतून होत आहे.

फोटो १८म्हसवड-डेंग्यू

म्हसवड शहरातील साथरोग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या वतीने शहरात औषध फवारणी राबविण्यात येत आहे. (छाया : सचिन मंगरुळे)

Web Title: Dengue, Chikungunya-like epidemic in Mhaswad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.