सातारकरांनो काळजी घ्या! शहरातील २२० घरांत आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, जिल्हा हिवताप विभागाकडून सर्व्हे सुरू

By सचिन काकडे | Published: July 14, 2023 12:55 PM2023-07-14T12:55:14+5:302023-07-14T12:56:43+5:30

आरोग्य सेवकांकडून घर व परिसरातील पाण्याचे कंटेनर तपासले जात आहेत

Dengue larvae in 220 houses in Satara city, survey started by district winter heat department | सातारकरांनो काळजी घ्या! शहरातील २२० घरांत आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, जिल्हा हिवताप विभागाकडून सर्व्हे सुरू

सातारकरांनो काळजी घ्या! शहरातील २२० घरांत आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, जिल्हा हिवताप विभागाकडून सर्व्हे सुरू

googlenewsNext

सातारा : साथरोग नियंत्रणासाठी जिल्हा हिवताप विभागाने सातारा शहरात सर्व्हेचे काम हाती घेतले असून, आठ दिवसांत २२० घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. सर्व्हेसाठी आठ आरोग्य सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांंकडून डेंग्यू अळ्यांचा शोध घेऊन त्या नष्ट केल्या जात आहेत.

जिल्हा परिषद व हिवताप विभागाकडून दरषर्वी मलेरिया, डेंग्यू, क्षयरोग, चिकनगुनिया अशा आजारांचा गृहभेटीद्वारे सर्व्हे केला जातो. पावसाळा सुरू झाल्यापासून सर्व्हेचे काम हाती घेण्यात आले असून, जिल्ह्यासह सातारा शहरात हे काम गतीने सुरू आहे. शहरातील सदर बझार, लक्ष्मीटेकडी, करंजे, प्रतापगंज, केसरकर पेठ, माची पेठ आदी भागात सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.

या कामी नेमण्यात आलेल्या आठ आरोग्य सेवकांकडून घर व परिसरातील पाण्याचे कंटेनर तपासले जात आहेत. दि. ६ ते १३ जुलै या कालावधीत पथकाकडून शहरातील १ हजार ७८० घरांना भेट देण्यात आली. या घरांमधील पाण्याचे पिंप, फ्रीज, एसी, भंगार साहित्य आदींची तपासणी केली असता २२० घरांत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. या अळ्या नष्ट करण्यात आल्या असून, पाण्याची पिंपेही रिकामी करण्यात आली आहेत. डेंग्यू अळ्यांचा शोध घेण्याबरोबरच ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोळ्यांभोवती जळजळ, अशक्तपणा अशी लक्षणे असलेल्या नागरिकांच्या रक्ताचे नुमनेही तपासणीसाठी घेतले जात आहेत.

आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा

डेंग्यूच्या अळ्या प्रामुख्याने कुंडी, पाण्याचे पिंप, फ्रीजच्या मागील बाजूस असलेला पाण्याचा ट्रे, एसी, घराच्या आवारातील भंगार अशा ठिकाणी आढळून येतात. त्यामुळे नागरिकांनी एसी, फ्रीज वेळोवेळी स्वच्छ करावा. घराच्या परिसरात भंगार साहित्य असल्यास त्याची विल्हेवाट लावावी, पाण्याची डबकी बुजवावीत, आठवड्यात एक दिवस सर्व भांडी घासून, पुसून कोरडी करावी असे आवाहन हिवताप विभागाने केले आहे.

आठवड्याचा लेखाजोखा

१७८० घरांना भेटी
२२० घरांत डेंग्यूच्या अळ्या
३४,५१० पाण्याची पिंपे तपासली
२२० पिंपे रिकामी केली
१०० पिंपात ॲबेटिंग
३५ नागरिकांचे रक्ताचे नमुने घेतले

Web Title: Dengue larvae in 220 houses in Satara city, survey started by district winter heat department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.