खटावमध्ये डेंग्यूसदृश रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:42 AM2021-08-24T04:42:58+5:302021-08-24T04:42:58+5:30
खटाव : बदलत्या हवामानामुळे खटाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. डेंग्यू आणि डेंग्यूसदृश ...
खटाव : बदलत्या हवामानामुळे खटाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. डेंग्यू आणि डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्यानंतर खटाव ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम, तसेच गावात फवारणी करण्यास सुरुवात केली आहे.
डासांचे वाढते प्रमाण पाहता डेंग्यू हा डासांपासून पसरतो. त्याकरिता औषध फवारणी करण्याचे काम युद्धपातळीवर ग्रामपंचायतीच्यावतीने सुरू आहे. डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, तसेच नागरिकांनी देखील डेंग्यू डासाची उत्पत्ती होणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी व आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा, असे आव्हान सरपंच नंदकुमार वायदंडे व उपसरपंच अमर देशमुख यांनी केले आहे.
ग्रामपंचायतीतील स्वच्छता विभाग कामाला लागला आहे. गावात ज्या ठिकाणी पाणी साचले आहे तेथे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे, अशा ठिकाणी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य स्वतः आपल्या वाॅर्डमध्ये फॉगिंग मशीनद्वारे जंतूनाशक फवारणी करून घेत आहेत.
डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्यानंतर ‘लोकमत’मध्ये या संदर्भात बातमी प्रसिद्ध होताच आरोग्य विभागदेखील खडबडून जागे झाला आहे. खटाव ग्रामपंचायतीच्यावतीने देखील औषध फवारणी करून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
२३खटाव
खटाव ग्रामपंचायतीच्यावतीने फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करताना उपसरपंच अमर देशमुख, विशाल देशमुख, दीपक घाडगे, राहुल जमदाडे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. (छाया : नम्रता भोसले)