फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातही डेंग्यूसदृश रुग्ण
By admin | Published: November 2, 2014 09:13 PM2014-11-02T21:13:23+5:302014-11-02T23:30:17+5:30
विक्रांत पोटे : साठलेले पाणी स्वच्छ करा
फलटण : ‘फलटण शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने ग्रामस्थांनी याबाबत विशेष दक्षता घ्यावी. प्रामुख्याने पाणीसाठे व पावसाचे साठलेले पाणी स्वच्छ करण्याला प्राधान्य द्यावे,’ असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे यांनी केले आहे.
येथील सौरभ संतोष क्षीरसागर या तरुणाला डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे आढळल्यामुळे त्याला फलटण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती उत्तम आहे. तथापि, दुधेबावी येथील ग्रामस्थांनी त्याबाबत योग्य दक्षता घेऊन डेंग्यू अथवा अन्य साथरोग उद्भवणार नाहीत, यासाठी विशेष दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, दुधेबावी ग्रामपंचायतीने स्वच्छतेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, प्राथमिक शाळा, हॉटेल्स व दुकाने या परिसरात साठलेली घाण, कचरा तातडीने दूर करून परिसर स्वच्छ करावा. गटारातील घाणीतून साथरोग उद्भवण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायत परिसर, गेजगे गल्ली, सोनवलकर गल्ली, एकळ गल्ली, भांड गल्ली, आडके गल्ली या परिसरातील गटारांची स्वच्छता करावी, अशी मागणीही होत आहे. (प्रतिनिधी)
आरोग्य खात्याच्या वतीने तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून साथरोगाबाबत प्रत्येक गावात सर्वेक्षण करण्यात येत आहे. साथ रोगाबाबत सर्वसामान्यांना माहिती देऊन त्याबाबत विशेष दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी साथ रोगाबाबत दक्ष राहावे. विशेषत: थंडी तापासारखी लक्षणे आढळल्यानंतर लगेचच शासकीय अथवा खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहनही आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.