घना धाव रे... भिजव रान रे...!
By admin | Published: July 10, 2017 02:16 PM2017-07-10T14:16:01+5:302017-07-10T14:19:11+5:30
बळीराजाची आर्त हाक : पावसाअभावी माण तालुक्यातील पिके धोक्यात
आॅनलाईन लोकमत
पळशी (जि. सातारा), दि. १0 : नेहमीच दुष्काळी तालुका म्हणून चर्चेत असलेल्या माण तालुक्यातील स्थिती पावसाअभावी याहीवर्षी चिंताजनकच आहे. माण तालुक्यातील पळशी, मार्डी, मोहीसह परिसरात महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जुनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाच्या हलक्या सरी झाल्या आणि शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला पण त्यानंतर पावसाने दडी मारली. दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याने घना धाव रे.. भिजव रान रे.. अशी आर्त हाक आता बळीराजा देत आहे.
पळशीसह परिसरात रिमझिम पावसाच्या आशेवरच अनेकांनी बाजरीची पेरणी केली. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे बाजरी उगवून आली खरी पण पावसाने ओढ दिल्याने बाजरीच्या पिकाने मान टाकली आहे. येत्या आठ ते दहा दिवसात पाऊस न झाल्यास पिके करपून जाऊन दुबार पेरणीची संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अनेक शेतकऱ्यांनी पावसाला सुरूवात होताच लागवड करता यावी यासाठी जमिनीची मशागत करून कांद्यासाठी सरी सोडून ठेवली आहे, पण पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा पीक दरात नेहमीच हुलकावणी देत असल्याने आता मका पीक घेण्यास पसंती दर्शवली आहे. कांद्याच्या तुलनेत मका पिकास उत्पादन खर्च कमी येत आहे तर वारंवार औषध फवारणी करावी लागत नसल्याने आणि मजुरांची फारशी गरज भासत नसल्याने मका पीक घेण्याकडे अनेकांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे पळशीसह परिसरात यावर्षी कांद्याचे उत्पादन घटणार आहे. मात्र, पाऊस नसल्याने उगवून आलेला मका किती दिवस तग धरणार ? असा प्रश्नही भेडसावत आहे.
परिसरातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पहात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. पाऊस न झाल्यास केलेला खर्च वाया जाऊन दूबार पेरणीची टांगती तलवार डोक्यावर असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे.
तळी, तलाव ठणठणीत
दरवर्षी बेंदूर सणावेळी जवळपासच्या तळी व तलावात थोड्याफार प्रमाणात पावसाच्या पाण्याचा साठा होतो. मात्र, यावर्षी तळी व तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. परिणामी बेंदूर सणाला गाईगुरांना तलावावर न धुता घरीच धुवावे लागले. बाजारपेठेतही शेतकऱ्यांनी फारशी खरेदी केली नाही. त्यामुळे पाऊस नसल्याचा परिणाम सणावर होताना दिसला.
आठ-दहा दिवसात पाऊस न झाल्यास बाजरीचे पीक हातचे जाणार आहे. विहीरीतही पुरेसे पाणी उपलब्ध नाही. पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
- आनंदा कचरे, शेतकरी, माळीखोरा