कृषी विभाग अलर्ट; सहा खत विक्रेत्यांना दणका, चारचे निलंबन; दोघांचा परवाना रद्द
By नितीन काळेल | Published: May 26, 2023 07:05 PM2023-05-26T19:05:06+5:302023-05-26T19:05:17+5:30
सध्या जिल्ह्यात १२ भरारी पथकांच्या माध्यमातून वाॅच सुरूच आहे.
सातारा : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग अलर्ट असून खताच्या विक्रीत अनियमितता, पाॅश मशिनचा वापर न करणे आदी कारणांमुळे ६ विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यातील ४ विक्री केंद्राच्या परवान्याचे निलंबन तर दोघांचा रद्द करण्यात आला आहे. यामुळे खत विक्रेत्यांत खळबळ उडाली आहे. तर सध्या जिल्ह्यात १२ भरारी पथकांच्या माध्यमातून वाॅच सुरूच आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा समजला जातो. जवळपास सवा तीन लाख हेक्टरवर पेरणी होते. त्यामुळे कृषी विभाग शेतकऱ्यांना खते आणि बियाणे दर्जेदार मिळावेत यासाठी प्रयत्नशील असतो. त्यासाठी तालुकानिहाय भरारी पथके स्थापन करुन वाॅच ठेवण्यात येतो. शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यास खात्री करुन संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येते. आताही कृषी विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी आतापर्यंत ६ खत विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय.
युरिया खताच्या विक्रीत अनियमीतता केल्याचे दिसून आले. तसेच जादा दराने खताची विक्री, पाॅश मशिनचा वापर न करणे, मशिनवरील आणि प्रत्यक्षातील साठा न जुळणे, योग्य बील न देणे आणि परवाना नुतनीकरण न केल्यामुळे ६ दुकानदारांवर कारवाई झालेली आहे. यामधील दोषी आढळलेल्या ४ विक्री केंद्रावर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर २ खत विक्री केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यामध्ये वाई तालुक्यातील ३, पाटणमधील २ आणि सातारा तालुक्यातील एका दुकानाचा समावेश आहे.
दरम्यान, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दर्जेदार खते आणि बियाणे मिळण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. तसेच जिल्ह्यातील खते आणि बियाणे विक्री केंद्रावर नजर ठेवण्यासाठी १२ पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ११ तालुक्यात प्रत्येकी एक आणि जिल्हास्तरावर स्वतंत्र एक अशी ही पथके कार्यरत आहेत. जिल्हास्तरावरील पथक जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे. ही भरारी पथके खते, बियाणे आणि कीटकनाशके दुकानांची अचानक तपासणी करत आहेत. तसेच शेतकऱ्यांची तक्रार आल्यासही तपासणी केली जात आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच ६ खत दुकानांवर कारवाई झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.