माउलींच्या पालखीचे फलटणकडे प्रस्थान-विठुरायाच्या गजराने भाविक भक्तिरसात चिंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 13:24 IST2019-07-05T13:22:00+5:302019-07-05T13:24:02+5:30
विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा तरडगाव (ता. फलटण) येथील पाहुणचार घेऊन गुरुवारी सकाळी फलटणकडे मार्गस्थ झाला.

माउलींच्या पालखीचे फलटणकडे प्रस्थान-विठुरायाच्या गजराने भाविक भक्तिरसात चिंब
तरडगाव : विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा तरडगाव (ता. फलटण) येथील पाहुणचार घेऊन गुरुवारी सकाळी फलटणकडे मार्गस्थ झाला. यावेळी भाविकांनी केलेल्या ज्ञानेश्वर माउलींच्या गजराने वातावरण प्रफुल्लित झाले होते.
विठुरायाच्या ओढीचे भक्तिरसात बुडालेला वैष्णवांचा मेळा मंगळवारी दुपारी महर्षी वाल्मिकी यांच्या वाल्हा नगरीचा निरोप घेऊन सातारा जिल्ह्यात दाखल झाला. लोणंद येथे मुक्काम करून पालखी सोहळा वैभवी लवाजम्यासह बुधवारी फलटण तालुक्यातील तरडगाव येथे दाखल झाला. नभांगणी फडकणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा निनाद अन् ज्ञानोबा माउलींच्या जयघोषाने माउलींच्या दर्शनासाठी आलेले भाविक भक्तिरसात चिंब झाले.
बुधवारी चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण पार पडले. हजारो भाविकांनी हा सोहळा ह्ययाचि देही याचि डोळाह्ण अनुभवला. तरडगाव येथे विसावा घेतल्यानंतर पालखी सोहळा गुरुवारी सकाळी फलटणच्या दिशेने मार्गस्थ झाला. भाविकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी पालखीला निरोप दिला. यावेळी राज्यभरातील भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती.