Satara: श्री सेवागिरी महाराजांच्या दिंडीचे सोमवारी प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 01:31 PM2024-07-06T13:31:13+5:302024-07-06T13:32:23+5:30
श्री सेवागिरी देवस्थानच्या पायी पालखी सोहळ्याचे यंदाचे २९वे वर्ष
पुसेगाव : येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने दि. ८ ते १८ रोजीदरम्यान आषाढी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची मुक्काम, अल्पोपाहार, जेवण, आरोग्यसेवा तसेच औषधपाण्याची मोफत सोय केली आहे. या दिंडीत पुसेगाव व पंचक्रोशीतील अधिकाधिक वारकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव व विश्वस्तांनी केले.
श्री सेवागिरी देवस्थानच्या पायी पालखी सोहळ्याचे यंदाचे २९वे वर्ष आहे. सोमवार, दि. ८ रोजी सकाळी ७:३० वाजता श्री सेवागिरी महाराज पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होईल. सोमवार, दि. ८ रोजी महिमानगड, मंगळवार, दि. ९ रोजी लोधवडे, बुधवार, दि. १० रोजी म्हसवड, गुरुवार, दि. ११ रोजी पिलीव, शुक्रवार, दि. १२ रोजी तांदूळवाडी, शनिवार, दि. १३ रोजी भाळवणी, रविवार, दि. १४ रोजी उपरी, सोमवार, दि. १५ रोजी वाखरी, मंगळवार, दि. १६ रोजी पंढरपूर मुक्कामी पोहोचेल. बुधवार, दि. १७ रोजी चंद्रभागेत स्नान करून नगरप्रदक्षिणा होईल. गुरुवार, दि. १८ रोजी चंद्रभागा स्नान करून दुपारी एकनंतर दिंडी तीर्थक्षेत्र पुसेगावकडे ट्रकमधून प्रस्थान करील.
ट्रस्टमार्फत दिंडीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचा अपघाती विमा उतरवला जाईल. सर्व मुक्कामांच्या ठिकाणी निवाऱ्यासाठी अतिरिक्त तंबूंची सोय केली आहे. पंढरपूर येथील मुक्कामात वारकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सोयीसुविधांनी युक्त प्रशस्त निवाऱ्याची सोय ट्रस्टमार्फत केली आहे. दिंडी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.