विद्यापीठातील कॅशलेस सुविधेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 01:12 AM2018-07-30T01:12:25+5:302018-07-30T01:12:28+5:30

Deposit of cashless facility at university | विद्यापीठातील कॅशलेस सुविधेचा बोजवारा

विद्यापीठातील कॅशलेस सुविधेचा बोजवारा

Next
<p>
कोल्हापूर : ‘कॅशलेस’ व्यवहारासाठीची सुविधा बंद असल्याने प्रवेशासह विविध स्वरूपांतील शुल्काचे चलन करताना ‘कार्ड नको, तर रोख पैसे भरा’ असे शिवाजी विद्यापीठात सांगितले आहे. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार कॅशलेस व्यवहारासाठी आॅनलाईन पेमेंट गेट-वे, पीओएस मशीनची सुविधा विद्यापीठ प्रशासनाने उपलब्ध करून दिली. या सुविधांची सुरुवात केल्यानंतर विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील १०७ क्रमांकाच्या खोलीमध्ये विविध स्वरूपांतील शुल्काचे चलन भरून घेताना डेबिट, क्रेडिट कार्डची सक्ती करण्यात आली. पेमेंट गेट-वे, पीओएस मशीनच्या सुविधेबाबत विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. विद्यार्थ्यांतूनही कॅशलेस सुविधेचे स्वागत करण्यात आले. मात्र, अचानकपणे गेल्या काही दिवसांपासून चलनासाठी कॅशलेस सुविधेच्या वापराऐवजी रोख पैसे भरण्यास सांगितले जात आहे. प्रवेश प्रक्रियेची धावपळ सुरू असतानाच कॅशलेस सुविधा बंद असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. कॅशलेस व्यवहाराची सुविधा पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, याबाबत विद्यापीठ प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबतची माहिती घेऊन वित्त व लेखाधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या जातील, असे सांगितले.
ऐनवेळी एटीएमची शोधाशोध
सध्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ज्यांना अन्य शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांची काही प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, मायग्रेशन प्रमाणपत्र, आदी मिळविण्याची धावपळ सुरू आहे. अशा स्थितीत शुल्क हे कार्डद्वारे स्वीकारले जाते, अशी विद्यार्थ्यांना माहिती आहे. त्यानुसार मुख्य इमारतीमधील १०७ क्रमांकाच्या खोलीमध्ये चलन करण्यासाठी विद्यार्थी येतात.
चलन करण्याच्या रांगेत थांबल्यानंतर काउंटरवर येताच त्यांना ‘कार्ड चालणार नाही, रोख पैसे द्या’ असे सांगितले जात आहे. कार्ड असल्याने शक्यतो अनेकजण रोख स्वरूपात पैसे जवळ बाळगत नाहीत; त्यामुळे चलन करण्यासाठी अशा विद्यार्थ्यांना एटीएमची शोधशोध करावी लागते. सांगली, साताºयाहून आलेले पालक, विद्यार्थ्यांना त्याचा अधिक त्रास होत असल्याचे काही विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

Web Title: Deposit of cashless facility at university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.