मायणीत विद्यार्थ्यांचे उपोषण
By Admin | Published: January 24, 2017 12:49 AM2017-01-24T00:49:47+5:302017-01-24T00:49:47+5:30
९५ जणांचा निकाल अधांतरी : महाविद्यालयाने दंड भरण्याची मागणी
सातारा : खटाव तालुक्यातील मायणी येथील मेडिकल कॉलेजने प्रवेशावेळी खोटी माहिती देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक केली असून शासनाचा दंड भरण्यासहीे टाळाटाळ केल्याने सप्टेंबर २०१५ मध्ये परीक्षा दिलेल्या ९५ विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे, असा आरोप करत विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
याबाबत माहिती अशी की, मायणी येथील इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स रिसर्च (आयएमएसआर)मध्ये सन २०१४-१५ मध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा दंडापोटी महाविद्यालयाने शासनाकडे वीस कोटींचा दंड भरावा, यासाठी महाविद्यालय प्रांगणात ९५ विद्यार्थ्यांसह पालकांनी बुधवार, दि. १८ पासून उपोषण सुरू आहे. ९५ विद्यार्थ्यांचा प्रवेश नियमबाह्यप्रकरणी मुंबईच्या प्रवेश नियंत्रण समितीने महाविद्यालय प्रशासनास जबाबदार धरून प्रती विद्यार्थी वीस लाखांचा दंड आकारला.
हा दंड महाविद्यालयाने न भरल्याने विद्यार्थी न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन सरकारी वकिलामार्फत विद्यार्थी अन्य महाविद्यालयात सामावून घेण्याबाबत माहिती दिली. न्यायालयाने सरकार पाठिंबा देतोय म्हणून प्राधिकरणाने आकारलेला दंड शासनाने भरून महाविद्यालयाकडून नंतर वसूल करावे, असे आदेश दिले. शासनाने हा दंड न्यायालयात भरला आहे.
आता महाविद्यालय प्रशासन हा दंड शासनास भरण्यास टाळाटाळ करत आहे. परंतु सप्टेंबर २०१५ मध्ये परीक्षा दिलेल्या ९५ विद्यार्थ्यांचा निकाल अजूनही राखून ठेवला आहे.
शासनाने या विद्यार्थांचा निकाल जाहीर करून त्यांना अन्य महाविद्यालयात सामावून घेऊन त्यांचे भवितव्य वाचवावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)