कायदेशीर समाजाचे घटक असणारे ‘ते’ लसीकरणापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:31+5:302021-07-08T04:26:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : समाजातील प्रत्येक स्तरातील घटकाला कोविड प्रतिबंधक लसीकरण मिळावे यासाठी सर्वत्रच मोहीम जोरकसपणे सुरू आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : समाजातील प्रत्येक स्तरातील घटकाला कोविड प्रतिबंधक लसीकरण मिळावे यासाठी सर्वत्रच मोहीम जोरकसपणे सुरू आहे. मात्र, अद्यापही समाजात अस्तित्वात असणारे तृतीयपंथी या लसीकरणाच्या मोहिमेपासून कोसो दूर आहेत. अनेक तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या लसीकरणाचा विषयच मुख्य प्रवाहाच्या बाहेर पडला आहे.
देशभरात सध्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी त्यानंतर अतिजोखमीचे आजार असणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आणि आता चिमुकले सोडले तर प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी हे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना अद्याप लस मिळालेली नाही. याविषयी आरोग्य यंत्रणेसह सर्वांनीच हात झटकल्याने त्यांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
आरोग्य यंत्रणेत तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष किंवा खाटही नाही. त्यामुळे समुदायातील अनेकांना प्राणाला मुकावे लागले आहे. या समुदायातील अनेकांचे हातावर पोट असल्यामुळे जीव धोक्यात घालून ते बाहेर फिरत आहेत. सुरक्षिततेचा विचार करून लसीकरणाच्या ठिकाणी पोहोचल्यावर लस संपलीये, तुम्हाला देऊ शकत नाही, तुम्हाला लस द्यायला परवानगी नाही, अशी कारणं सांगितली जातात. कोविडपासून प्रतिबंध होण्यासाठी उपलब्ध असलेल्या लसीकरणापासून त्यांना वंचित ठेवणं हे त्यांच्या हक्कावर आणलेली गदा ठरणारे आहे.
चौकट :
कुठं किती तृतीयपंथी
सातारा : १४७
कऱ्हाड : १०६
वाई : ६७
फलटण : ८९
माण : ७७
पाटण : ४९
कोरेगाव : ११३
खटाव : ७४
खंडाळा : ५९
महाबळेश्वर : ३८
जिल्ह्यात झालेले लसीकरण
पुरूष : ५२९४०८
महिला : ४७८८२४
तृतीयपंथी : ९१
या आहेत अडचणी
तृतीयपथीयांमध्ये तंत्रज्ञानातील साक्षरतेचा अभाव आहे
शासनदरबारी नोंद असलेली कागदपत्रे त्यांच्याकडे नाहीत
तृतीय लिंगाविषयीच्या लसीकरणाचे धोरण यंत्रणेकडून स्पष्ट नाही
केवळ तृतीय लिंगी म्हणूनही लाभार्थी लसीकरणातून वंचित
चौकट :
आरोग्याची होतेय कायम हेळसांड
तृतीयपंथीयांच्या आरोग्याचा प्रश्न वषार्नुवर्षे दुर्लक्षित स्थितीच आहे. एचआयव्ही टेस्ट करायला जाणाऱ्या तृतीयपंथीयांना हात लावणंही काहींना किळसवाणं वाटत असल्याने हात न लावताच शरीरातून रक्त काढून घेतलं जात असल्याच्या तक्रारी तृतीयपंथीयांनी वारंवार मांडल्या आहेत. त्यामुळे जो चांगली वागणूक देईल तो उत्तम डॉक्टर हे गणित त्यांनी डोक्यात ठेवलं. कोविडकाळात तर प्रशासनाने त्यांच्या अस्तित्वाची दखलही घेतली नाही.
लसीकरणासाठी स्वतंत्र शिबिराची गरज
देशभर सर्वत्रच लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी निवासी वसाहती, गृहसंकुलात लसीकरण मोहिमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच धर्तीवर निव्वळ तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण शिबिराचे आयोेजन होणे महत्त्वाचे आहे. यामुळे समुदायातील लाभार्थ्यांचे लसीकरण करणे सोपे जाईल. वैयक्तिक पातळीवर लसीकरणासाठी नोंदणी करताना लाभार्थ्यांना अनेक अडचणी येतात. शिवाय लसीकरणाबाबत समुदायात जनजागृतीचाही अभाव दिसून येतो.
..................