ढगाळ हवामानाची पिकांवर गदा, उत्पन्नात होणार घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 10:47 AM2019-12-04T10:47:02+5:302019-12-04T10:50:17+5:30
खंडाळा तालुक्यात परतीच्या आणि अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. खरिपाची पिके आणि फळबागा पाण्याखाली गेल्या. या नुकसानीतून सावरण्यापूर्वीच ढगाळ हवामानाचे सावट शेतीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे अवकाळीची बाधा संपली नसतानाच आता दूषित हवामानाची बाधा शेतकऱ्यांवर ओढवली आहे.
दशरथ ननावरे
खंडाळा : तालुक्यात परतीच्या आणि अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. खरिपाची पिके आणि फळबागा पाण्याखाली गेल्या. या नुकसानीतून सावरण्यापूर्वीच ढगाळ हवामानाचे सावट शेतीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे अवकाळीची बाधा संपली नसतानाच आता दूषित हवामानाची बाधा शेतकऱ्यांवर ओढवली आहे.
खंडाळा तालुक्याच्या शेतीचे आॅगस्टमधील पावसातच मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर परतीच्या पावसाने तालुक्यात धुमाकूळ घातला. यामध्ये बहुतांशी शेती पाण्याखाली गेली. शेतामध्ये पाणी घुसल्याने पिकाचेही मोठे नुकसान झाले. विशेषत: पिके कणसासह पाण्यात बुडाली, त्यामुळे मोठे नुकसान झाले.
गेल्या दोन दिवसांत ढगाळ वातावरणाचे सावट राहिल्याने खंडाळा तालुक्यातील विविध भागातील ऊस, भुईमूग, टोमॅटो, कांदा तसेच कडधान्याची पिके व काही फळबागा यावर याचा मोठा परिणाम होत आहे. अशा प्रकारच्या हवामानामुळे कांदा पिकावर करपा रोग, नवीन ऊस लागवडीवर तांबेरा, भाजीपाल्याच्या पिकावर अळीचा व किडीचा प्रादुर्भाव तसेच वेलीवर्गातील पिकांवर मुरकुटा रोग पसरण्याची भीती वाढली आहे.
खंडाळा तालुकाच्या एकूण क्षेत्रापैकी खरीप हंगामात ९ हजार ४४७ हेक्टर क्षेत्रात पिकांची लागवड झाली होती. यापैकी तालुक्याच्या ६७ गावांमधील १३ हजार ११८ शेतकऱ्यांचे ४ हजार ४२४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे समोर आले. नुकसानीतून बाहेर पडण्यापूर्वीच दूषित हवामानाने घेरल्याने शेतकरी संकटात आहे.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. संपूर्ण पिकांचे नुकसान झाले असतानाच आता ढगाळ हवामानाच्या कोंडीत शेतकरी सापडलाय. आमच्या नवीन ऊस लागवडीवर तांबेरा आणि करपा रोग पसरण्याची भीती आहे. अगोदरच शेतकरी उघड्यावर आला असताना हे पुन्हा संकट म्हणजे दुष्काळात तेरावा अशी स्थिती आहे.
- अॅड. सचिन धायगुडे,
शेतकरी बोरी
ढगाळ वातावरणाने कांदा पिकाची पात मुरकटली आहे. तसेच काही ठिकाणी करपा रोगाची लागण होऊ लागलीय. सुरुवातीच्या वाढीलाच प्रादुर्भाव झाल्याने पिकांची उत्पादन क्षमता घटते. शेतीवर एकामागे एक संकट राहिल्यास शेतकरी उद्ध्वस्त होईल.
- नवनाथ ससाणे,
शेतकरी अंदोरी