उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी साताऱ्यात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:38 AM2021-05-26T04:38:08+5:302021-05-26T04:38:08+5:30

सातारा : महाराष्ट्रातील इतर मोठ्या जिल्ह्यांच्या तुलनेत सातारासारख्या छोट्या जिल्ह्यात दररोज दोन ते अडीच हजाराच्यावर रुग्णवाढ होत आहे. ...

Deputy Chief Minister, Health Minister should come to Satara | उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी साताऱ्यात यावे

उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी साताऱ्यात यावे

Next

सातारा : महाराष्ट्रातील इतर मोठ्या जिल्ह्यांच्या तुलनेत सातारासारख्या छोट्या जिल्ह्यात दररोज दोन ते अडीच हजाराच्यावर रुग्णवाढ होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून, साताऱ्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लक्ष घालावे. त्यांनी हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा,’ असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेले महिनाभर सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. आता पुन्हा जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन असतानाही महिनाभरात रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही, मग आता या पाच दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये येईल, असे वाटत नाही. कालच्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये १४२३, पुणे जिल्ह्यात ९००, सोलापूरमध्ये १५३६, सांगलीमध्ये ११२६, तर कोल्हापूर जिल्ह्यात १७७४ च्या आसपास बाधित रुग्ण आढळून आले आणि सातारा जिल्ह्यात तब्ब्ल २६४८ रुग्ण वाढले. गेल्या काही दिवसांपासून दररोज दोन ते अडीच हजाराच्यावर रुग्णवाढ होत असून, ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.

लॉकडाऊन सुरू असतानाही रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही, याचाच अर्थ कुठेतरी काही तरी चूक होत आहे, हे निश्चित. जिल्ह्यात हीच परिस्थिती राहिल्यास मोठा अनर्थ ओढवेल. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालावे. त्यांनी तातडीने साताऱ्यात यावे आणि जिल्ह्यातील कोरोना महामारीचा आढावा घ्यावा. तसेच जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी आणि त्यांच्यामार्फत कोरोनाला आळा घालण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोक तसेच हातावर पोट असणाऱ्या, रोजंदारी करणाऱ्या गोर-गरीब लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. असंख्य लोकांची उपासमार सुरू आहे. लॉकडाऊन असाच सुरू राहिल्यास लोकांना उदरनिर्वाह करणे आणि जगणे मुश्किल होणार आहे, याचीही उपमुख्यमंत्री, आरेाग्यमंत्री व प्रशासनाने गंभीर दाखल घ्यावी. तसेच रॅपिड टेस्टमध्ये वाढ करावी. ग्रामीण भागात सर्वत्र रॅट टेस्ट कीट उपलब्ध करून द्यावी आणि बाधित आहेत, पण कोरोनाची लक्षणे नाहीत, अशा लोकांचा शोध घ्यावा, जेणेकरून कोरोनाची साखळी तोडली जाईल.

Web Title: Deputy Chief Minister, Health Minister should come to Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.