कोरेगावात उपकार्यकारी अभियंत्यास लाच घेताना पकडले

By दत्ता यादव | Updated: February 20, 2024 22:18 IST2024-02-20T22:18:05+5:302024-02-20T22:18:27+5:30

गुन्हा दाखल : महावितरण कंपनीतील लाचखोरीचा पर्दाफाश

deputy executive engineer caught taking bribe in koregaon | कोरेगावात उपकार्यकारी अभियंत्यास लाच घेताना पकडले

कोरेगावात उपकार्यकारी अभियंत्यास लाच घेताना पकडले

दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : ठेकेदाराकडून कामांची मंजुरी देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना, कोरेगाव उपविभाग कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता मदन रामदास कडाळे (वय 46 रा. कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर. सध्या रा. तामजाईनगर सातारा) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात कडाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मदन कडाळे हा कोरेगाव उपविभागात उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहे. काही महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यातून त्याची कोरेगावात नियुक्ती झाली होती. तक्रारदार हे नोंदणीकृत ठेकेदार असून, त्यांची स्वतःची फर्म आहे. ते विद्युत पोल उभारणे आणि विद्युत कनेक्शन देणे, याची कामे करतात. त्यांनी घेतलेल्या तीन कामांपैकी सुरुवातीच्या कामाचे व नव्याने जमा केलेल्या दोन कामांना मंजुरी देण्यासाठी ११ हजार रुपयांची लाच कडाळे यांनी मागितली होती.

यासंदर्भात ठेकेदाराने सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार केली होती. त्यानुसार मंगळवारी दुपारी आर. एम. देसाई पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या महावितरण कंपनीच्या उपविभाग कार्यालयात सापळा रचण्यात आला. ठेकेदाराने पैसे देत असताना इशारा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कडाळे याला रंगेहाथ पकडले व रक्कम जप्त केली.

लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर मदन कडाळे याला तत्काळ कोरेगाव पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिनियमानुसार रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कडाळे याला सातारा येथील कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले.

महावितरण कंपनी विरोधात तक्रारींचा महापूर

कोरेगाव तालुक्यात महावितरण कंपनीची कोरेगाव, रहिमतपूर व वाठार स्टेशन येथे तीन वेगवेगळी उपविभाग कार्यालये आहेत. छोट्या-मोठ्या कारणांसाठी वीज ग्राहकांना त्रास देणे, नवीन कनेक्शन देण्यासाठी टाळाटाळ करणे, आर्थिक व्यवहाराची अपेक्षा ठेवणे, सातत्याने पैशाची मागणी करणे आदींबाबत सातत्याने तक्रारी होत होत्या. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यामध्ये कोणी स्वारस्य दाखवले नव्हते. लाचखोरीचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला असल्याने कंटाळून एका ठेकेदाराने तक्रार केल्यानंतर उपकार्यकारी अभियंता दर्जाचा अधिकारी लाचखोरीच्या जाळ्यात सापडला.

Web Title: deputy executive engineer caught taking bribe in koregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.