उपनगराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:35 AM2021-01-22T04:35:43+5:302021-01-22T04:35:43+5:30
म्हसवड : म्हसवडच्या उपनगराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी यांनी आपला उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. सूर्यवंशी यांनी गुरुवारी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा ...
म्हसवड : म्हसवडच्या उपनगराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी यांनी आपला उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. सूर्यवंशी यांनी गुरुवारी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्याकडे स्वाधीन केला.
याबाबत माहिती अशी की, म्हसवड नगरपरिषदेमध्ये उपनगराध्यक्ष पदावरून राजकीय वातावरण काही दिवसांपासून गरम झाले होते. उपनगराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी यांनी पदाचा राजीनामा द्यावा यासाठी पालिकेतील सत्ताधारी व विरोधी गट एकत्र आले होते. उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा स्नेहल सूर्यवंशी यांनी द्यावा यासाठी पालिकेचे गटनेते धनाजी माने यांनी काही दिवसांपूर्वी पालिकेतील सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांशी चर्चा करून १४ जणांचा यासाठी पाठिंबा घेतला होता. पालिकेतील १४ सदस्य आपल्या सोबत असल्याचा दावा करीत धनाजी माने यांनी सूर्यवंशी यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्याचे निवेदन नगराध्यक्ष तुषार वीरकर यांच्याकडे दिले होते. त्यानुसार नगराध्यक्ष तुषार वीरकर यांनी शुक्रवार, दि. २२ रोजी पालिका सभागृहात विशेष सभा बोलवली होती. या बैठकीत उपनगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव मंजुर होणार होता. मात्र, तत्पूर्वीच स्नेहल सूर्यवंशी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसोबत पालिकेत येत आपला उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा मुख्याधिकारी डॉ. माने यांच्याकडे सोपवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
चौकट :
उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा सूर्यवंशी यांनी दिल्यामुळे नगरपालिकेतील काही कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यामुळे त्यांनी गत चार वर्षांत केलेली पालिका हद्दीतील विकासकामे व कर्मचाऱ्यांना दिलेला सन्मान व आपुलकीच्या कारभाराविषयी दिवसभर शहरात चर्चा सुरू होती.
प्रतिक्रिया -
स्वखुशीने राजीनामा दिला : सूर्यवंशी
पालिकेतील सत्ता आमच्या ताब्यात देताना म्हसवडकर जनतेसोबत आमच्या पार्टीने काही आश्वासने दिली होती. ती पूर्ण करण्याची नामी संधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपाने आली होती. वर्षभरात कोरोनामुळे कोणतीही विकासकामे झाली नसली तरी वर्षभरात राज्य शासन, उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने म्हसवड शहरासाठी कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर करता आली. त्या कामांचा प्रारंभ लवकरच होणार आहे. मी पदावर असो किंवा नसो, म्हसवडकरांसाठी मंजूर केलेली सर्व विकासकामे मार्गी लावण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. आमच्या पार्टीत कोणतेही मतभेद नसून, भविष्यात सर्व पार्टी एकसंध असल्याचे म्हसवडकर जनतेला दिसून येईल, असा विश्वास स्नेहल सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.