पाटणला ४१ ग्रामपंचायतींवर देसाई गटाची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:39 AM2021-01-19T04:39:45+5:302021-01-19T04:39:45+5:30
पाटण : तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या गटाने अपेक्षेपेक्षा जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसत असून, एकूण ...
पाटण : तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या गटाने अपेक्षेपेक्षा जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसत असून, एकूण ७२ ग्रामपंचायतींपैकी ४१ ग्रामपंचायतींवर मंत्री देसाई गटाने झेंडा फडकावला आहे, तर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजित पाटणकर यांच्या गटाला केवळ २० ग्रामपंचायती राखण्यात यश आले आहे.
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या तारळेमध्ये सत्तांतर झाले असून, ही ग्रामपंचायत देसाई गटाकडून राष्ट्रवादी आणि भाजप या आघाडीकडे गेली आहे, तर कुंभारगाव ग्रामपंचायतीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानणाऱ्या गटाने बाजी मारली आहे. उर्वरित सात ग्रामपंचायतींमध्ये देसाई आणि पाटणकर गटाचे समान बलाबल असल्याचे दिसून येत आहे, तर इतर दोन ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या ताब्यात गेल्या. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. कोयना विभागात माजी मंत्री पाटणकर यांचे समर्थक सभापती राजाभाऊ शेलार यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांना चितपट केल्याचे दिसून आले. मोरणा विभागातील ग्रामपंचायतीवर शंभुराज देसाई यांच्या गटाने विजयी मालिकेचा सपाटाच लावला. ढेबेवाडी विभागातील बहुतांश ग्रामपंचायतीही देसाई गटाने ताब्यात मिळवल्या. मल्हारपेठ, चाफळ व मणदुरे विभागातील अनेक ग्रामपंचायतीवर देसाई गटाने आपल्या बाजूने धक्कादायक निकाल लावून सत्ता मिळवल्याचे दिसून येत आहे.
या निवडणुकीत पाटणकर गटाला अपेक्षेपेक्षा सर्वात कमी ग्रामपंचायती मिळाल्याने मोठा धक्का बसला आहे. मंत्री शंभुराज देसाई गटाने हुंबरळी, मुळगाव, वाडीकोतवडे, कोकिसरे, धावडे, कसणी, गोकुळ तर्फ पाटण, पेठशिवापूर, त्रिपुडी, चोपडी, शिंदेवाडी, सोनवडे, चोपदारवाडी, वाटोळे, मणदुरे, आंबळे, मंद्रुळ हवेली, दिवशी खुर्द, बोडकेवाडी, ठोमसे, निगडे, कोरिवळे, उमरकांचन, हावळेवाडी, चव्हाणवाडी, खोणोली, मस्करवाडी, मुरुड, बांबवडे, मालोशी, बाचोली, मोरेवाडी, पवारवाडी, जानुगडेवाडी, शिद्रुकवाडी, धामणी, काढणे, काळगाव, चव्हाणवाडी या ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाने नेचल, मेंढेघर, काळोली, डोंगलेवाडी, तामकडे, सुळेवाडी, टोळेवाडी, चिटेघर, मेंढोशी, साखरी, केळोली, नावडी, सोन्याचीवाडी, कोचरेवाडी, शिंगणवाडी, कुठरे, करपेवाडी, चिखलेवाडी, कामरगाव या ग्रामपंचायती ताब्यात राखण्यात यश मिळवले
- चौकट
... या ग्रामपंचायतीत सत्तांतर
देसाई गटाकडून पाटणकर गटाकडे सत्तांतर झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये हुबरळी, गोकुळ तर्फ पाटण, त्रिपुडी, चोपडी, मणदुरे, दिवशी खुर्द, कोरिवळे, उमरकांचन, मुरुड, मालोशी, धामणी, मानेवाडी, कातवडी तर देसाई गटाकडून पाटणकर गटाकडे सत्तांतर झालेल्यांमध्ये सुळेवाडी, नावडी, शिंगणवाडी, करपेवाडी, पापर्डे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
- चौकट
... या गावात सत्ता कुणाची?
काहीर, कवडेवाडी, बोंद्री, चाफोली, पाठवडे, पिंपळोशी, सुपुडगेवाडी या ग्रामपंचायतींमध्ये देसाई आणि पाटणकर या दोन्ही गटांचे समान बलाबल असल्याचे दिसून येत असल्यामुळे या ग्रामपंचायतींवर कोणाची सत्ता, हे सांगणे अवघड आहे. ढेबेवाडी विभागातील खळे आणि गुढे या दोन्ही ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा विजय झाला आहे.