आसमंत उजळवून तरुणाई देणार सरत्या वर्षाला निरोप!

By admin | Published: December 24, 2014 10:15 PM2014-12-24T22:15:01+5:302014-12-25T00:14:41+5:30

ज्योत से ज्योत : दहशतवादाचा धिक्कार करण्यासाठी एकतीस डिसेंबरला विद्यार्थी साताऱ्यात काढणार ‘कँडल मार्च’

Descent to brighten the sky! | आसमंत उजळवून तरुणाई देणार सरत्या वर्षाला निरोप!

आसमंत उजळवून तरुणाई देणार सरत्या वर्षाला निरोप!

Next

सातारा : एकतीस डिसेंबरचा संबंध तरुणाईशी जोडला जातो तो बहुधा नशेच्या माध्यमातून. ‘क्लासमेट’ होतात ‘ग्लासमेट’. पण नानाविध समस्यांनी अवघं जगच लडखडत असताना तरुणांनी दोन्ही पायांवर ताठ उभं राहूनच नव्या वर्षात पदार्पण केलं पाहिजे, या उदात्त भावनेतून दोन विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला आणि पाहता-पाहता ठिणगीचा वणवा झाला.
दहशतवादी पेशावरच्या शाळेत घुसतात आणि सव्वाशे निरागस मुलांचं शिरकाण करतात, ही दृष्यं टीव्हीवर पाहून कमालीच्या व्यथित झालेल्या वैष्णवी कारंजकर आणि अंकिता साळुंखे यांनी मित्र-मैत्रिणींंना साद घातली. व्हॉट्स-अप, फेसबुकवरून ‘मेसेज’ फिरले. पाहता-पाहता विविध कॉलेजमधले पन्नासेक विद्यार्थी एकवटले. बळी गेलेल्या विद्यार्थ्यांशी विद्यार्थी म्हणून आपलं नातं आहे, हे त्यांनी जाणलं. ठरवलं, थर्टीफर्स्टला नो सेलिब्रेशन! मिणमिणत्या प्रकाशात ग्लासाला ग्लास न लावता मेणबत्त्या उजळवून प्रकाशमान करायचा साताऱ्याचा आसमंत. जगभर पसरत चाललेल्या दहशतीच्या राक्षसाला सरत्या वर्षाबरोबरच द्यायचा निरोप. करायची एकमुखी मागणी ‘आर या पार’ लढाईची. आज ‘त्यांची’ उद्या ‘आपली’ वेळ येऊ शकते, याबाबत करायचं जागरण. कॉलेजा-कॉलेजात फिरून करायचं आवाहन. मित्र-मैत्रिणींना सोबत घेऊन यशस्वी करायचा आगळावेगळा कँडल मार्च!
उपक्रमावर नको कुठल्याच संस्था, संघटना, पक्षाचं लेबल. नको जात, धर्म, पंथ, आर्थिक क्षमतांचे अडथळे. निकष एकच... विद्यार्थी! कुणी म्हणालं, ‘अभ्यासाकडे लक्ष द्या. सांगितलंय कुणी भलतंच!’ कुणी म्हणालं, ‘मिळणार आहे का पाठिंबा कुणाचा? कशाला उगीच!’ पण हे उमदे तरुण खचले नाहीत. एकत्र येण्यासाठी जागा शोधू लागले. दोन-तीन ठिकाणी नकारघंटा ऐकल्यावर तालीम संघाचं मैदान मिळालं. ठरलं! ३१ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता तालीम संघाच्या मैदानात जमायचं.
वैष्णवी-अंकिताच्या मित्र-मैत्रिणींनी जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. ग्रुप केले. ग्रुपचं नेतृत्व आणि जबाबदारीही स्वीकारली. सायन्स कॉलेज, सातारा पॉलिटेक्निक, अभयसिंहराजे भोसले इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, गौरीशंकर अशा वेगवेगळ््या कॉलेजमधले मित्र एकत्र आले. मयूर खराडे, शुभम जाधव, विशाल जाधव, अक्षय तुपे, श्रेयस शाह, गणेश वंजारी, सूरज चव्हाण, काजल परदेशी, रेश्मा भोसले, तुषार साठे, शुभम साळुंखे, संकल्प शिंदे आणि इतर सुमारे पन्नास जणांनी सह्यांचं निवेदन तयार करून एकत्र येण्यासाठी जागा शोधली. मार्ग ठरवला. तालीम संघापासून वरच्या रस्त्याने मोती चौक, तेथून पोवई नाक्यावर सांगता.
आता आठवडाभर ही मंडळी उत्साहानं या ‘कँडल मार्च’ची तयारी करणार आहेत. पोलिसांची परवानगी काढण्यापासून सगळ्या तांत्रिक बाबींसाठी धावपळ करणार आहेत.... मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा क्षण संस्मरणीय करण्यासाठी! (प्रतिनिधी)



कॉलेजा-कॉलेजात फिरणार
विद्यार्थ्यांनी कोणत्याही संस्था-संघटनेचा ‘बॅनर’ न घेता पत्रक छापून घेतलंय. ‘थर्टीफर्स्ट’ला पाय लडखडू न देता कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन त्यात केलंय. हे पत्रक घेऊन मुलं-मुली गुरुवारपासून प्रत्येक कॉलेजमध्ये फिरणार आहेत. आजअखेर विद्यार्थ्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला असून, ३१ डिसेंबरला सातारची विधायक युवाशक्ती दाखवून देऊ, असा विश्वास या मित्र-मैत्रिणींनी व्यक्त केला.

Web Title: Descent to brighten the sky!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.