शहीद जवानाच्या कुटुंबीयांची वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 04:36 AM2018-04-04T04:36:33+5:302018-04-04T04:36:33+5:30
सातारा जिल्ह्याची ओळख आता सैनिकी जिल्हा म्हणून देशभर झालेली आहे. या जिल्ह्यातील जवान, लष्करी अधिकारी देशाचे संरक्षण करताना धारातीर्थी पडत आहेत. या जिल्ह्याचा आणि जवानांचा राज्याला प्रचंड अभिमान आहे.
मुंबई : सातारा जिल्ह्याची ओळख आता सैनिकी जिल्हा म्हणून देशभर झालेली आहे. या जिल्ह्यातील जवान, लष्करी अधिकारी देशाचे संरक्षण करताना धारातीर्थी पडत आहेत. या जिल्ह्याचा आणि जवानांचा राज्याला प्रचंड अभिमान आहे. सरकार दरबारी मात्र शहीद जवानांच्या कुटुंबीयांवर मदत निधीची रक्कम मिळवताना वणवण होत आहे.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मस्करवाडी, कुकडवाड येथील सुनील विठ्ठल सूर्यवंशी हे २०१०मध्ये सैन्यात दाखल झाले. सियाचीनमधील बर्फाळ प्रदेशात १० फेब्रुवारी २०१६ रोजी बर्फाचा कडा कोसळून दहा जवानांनी वीरमरण पत्करले. सियाचीनचा प्रदेश अत्यंत दुर्गम आणि मानवी क्षमतेची कसोटी घेणारा असतो. या घटनेत मस्करवाडीचे सुनील सूर्यवंशीही शहीद झाले. देशसेवा करताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना राज्य शासनातर्फे साडेआठ लाखांची मदत केली जाते.
सैनिक कल्याण खाते
संभाजीराव निलंगेकर-पाटील मंत्री असलेले सैनिक कल्याण खाते राज्यात कमालीचे सुस्त बनलेले आहे. वास्तविक, राज्य सरकारांकडून शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी मदत केंद्राकडून राज्याला परत मिळते. असे असूनही सैनिकांच्या कुटुंबीयांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे राज्यातील समस्त जवानांच्या कुटुंबीयांमध्ये राज्य सरकारबद्दल नाराजीची भावना आहे.
मुख्यमंत्र्यांची ‘ती’ माहिती
वरळीत ३१ जानेवारी रोजी ‘वन फॉर आॅल, आॅल फॉर वन’ या जवानांच्या सन्मानार्थ झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पूर्वी सरकारकडून साडेआठ लाख रुपये दिले जायचे, आम्ही २० लाख देतोय, यापुढे २५ लाख देऊ’ अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली होती.