मनोमिलनाच्या चर्चेमुळे इच्छुक भलतेच गारठले!
By admin | Published: February 6, 2017 12:51 AM2017-02-06T00:51:22+5:302017-02-06T00:51:22+5:30
रेठरे बुद्रुक गट : अनेकांची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका; राष्ट्रवादीने दंड थोपटले
नारायण सातपुते, रेठरे बुद्रुक : रेठरे बुद्रुक जिल्हा परिषद मतदार सं:घात मोहिते-भोसले गट एकत्रित लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांना आता ‘वेट अँड वॉच’ करावा लागत आहे. या मतदार संघात उमेदवार कोण-कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
कऱ्हाड तालुक्याच्या राजकारणात रेठरे बुद्रुक हे नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहे. यावेळी रेठरे बुद्रुक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे या जागेवर उमेदवारी मिळविण्यासाठी विविध गटाच्या समर्थकांनी आपापल्या गटामार्फत आपल्याच ‘सौ’ला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
गेल्या पंधरवड्यापूर्वी या गटात भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत होईल, असे वातावरण होते. परंतु काही दिवसांपासून येथील भोसले आणि मोहिते गट एकत्रित निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांची कृष्णेचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांच्याशी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत झालेली भेट मोहिते-भोसलेंचे मनोमिलनाचे संकेत देऊन गेली. मात्र, अद्याप दोन्ही गटांच्या नेत्यांनी याची जाहीर वाच्यता कोठेही केलेली नाही.
एकंदरीत या मनोमिलनाच्या वाऱ्यामुळे या गटातील इच्छुक तुर्तास वरवर पाहता शांत राहिले असल्याचे भासवत आहेत. मात्र, प्रत्यक्षात उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत.
शेरे गण सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी खुला असल्याने येथेही इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. रेठरे मतदार संघात यापूर्वी राष्ट्रवादी काँगे्रसचा गट थोड्या प्रमाणातच होता. परंतु कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या रूपाने येथे राष्ट्रवादीचा गटदेखील बळकट झाला आहे. काँगे्रस आणि राष्ट्रवादीची दक्षिणेत युती झाली नाही तर राष्ट्रवादीचा या मतदार संघात उमेदवार असणार, हे सुद्धा पाहावे लागेल. अविनाश मोहिते यांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीमधून निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत.
रेठरे बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघात रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द, आटके, जाधवमळा, शिवनगर, खुबी, जुळेवाडी, शेरे शेणोली, गोंदी आदी दहा गावांचा समावेश होतो. या जिल्हा परिषद गटात दोन गण आहेत. पैकी रेठरे गण सर्वसाधारण महिला तर शेरे गण सर्वसाधारण पुरुषासाठी राखीव आहे. गेल्या काही पंचवार्षिक निवडणुकांचा विचार केला तर आजपर्यंत जिल्हा परिषद सदस्य हा रेठरे बुद्रु्रक मधीलच झालेला आहे. पंचायत समितीसाठी इतर गावांना संधी मिळते.
चालू पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेचे तिकीट रेठरे बुद्रुकमध्येच राहणार की बाहेरच्या गावाला संधी दिली जाणार याविषयी देखील उलटसुलट चर्चा सुरू आहेत. गेल्या काही पंचवार्षिक निवडणुकीत भोसले गटाचा सदस्य आहे. तर मोहिते गटानेही जिल्हा परिषदेची सत्ता मिळविली आहे.
हे दोन्ही गट एकत्रित लढणार असल्याची चर्चा सुरू झाली असली तरी अविनाश मोहिते यांचा राष्ट्रवादीचा गट देखील कंबर कसून कामाला लागला आहे. त्यामुळे या गटात दुरंगी चुरशीची लढत पाहायला मिळेल.
सामान्यांसमोर मात्र अनेक
राजकीय प्रश्न!
सध्या तरी या मतदार संघातील लोकांना कित्येक प्रश्न पडले आहेत. मोहिते-भोसले एकत्र लढणार का? अविनाश मोहितेंना कोण-कोण मदत करणार? दोन्ही गटांचे उमेदवार कोण असणार? मोहिते-भोसले गटाचा जिल्हा परिषदेचा उमेदवार गावातील की बाहेरील? यासह अनेक प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहेत. या प्रश्नांची उत्तरे थोड्याच दिवसांत मिळतील.