‘एमपीएससी’त यश मिळवूनही काम सुरक्षा रक्षकाचे; राज्यातील ६२३ अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत

By प्रगती पाटील | Published: September 20, 2024 12:32 PM2024-09-20T12:32:40+5:302024-09-20T12:34:29+5:30

प्रगती जाधव - पाटील सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल मार्च ...

Despite success in 'MPSC', the job of a security guard 623 officers in the state are waiting for appointment | ‘एमपीएससी’त यश मिळवूनही काम सुरक्षा रक्षकाचे; राज्यातील ६२३ अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत

‘एमपीएससी’त यश मिळवूनही काम सुरक्षा रक्षकाचे; राज्यातील ६२३ अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत

प्रगती जाधव - पाटील

सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल मार्च २०२४ मध्ये जाहीर झाला. या परीक्षेत यश मिळवूनही राज्यातील ६२३ उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. अत्यंत नाजूक परिस्थिती असलेल्या कुटुंबातील काही उमेदवारांना नियुक्ती मिळत नसल्याने पोटापाण्यासाठी त्यांच्यावर अक्षरश: सुरक्षा रक्षक आणि खासगी क्लासवर शिकवणी घेण्याची वेळ आली आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ च्या उमेदवारांची अंतिम निवड यादी दोन वर्षांनी जाहीर झाली. मात्र, काही उमेदवार याविरोधात न्यायालयात गेल्यामुळे त्यावर स्थगिती येऊन नियुक्त्या रखडल्या होत्या. काही दिवसांपूर्वी याचिका निकाली काढून न्यायालयाने फेरनिवड यादी जाहीर करण्यावर कुठलीही बंधने घातली नाहीत. तरीही अद्याप यादी जाहीर न केल्यामुळे तहसीलदार, गटविकास अधिकारी या नियुक्त्या रखडल्या आहेत.

साताऱ्याचा अजय सुरक्षा रक्षक

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अजय ढाणे यांनी रात्रपाळीची नोकरी करत यश मिळविले. पण, दोन वर्षांत नियुक्ती न मिळाल्याने ते सुरक्षा रक्षक म्हणून सातारा औद्योगिक वसाहतीत कार्यरत आहेत.

सांगलीचा युवराज टेम्पो चालक

लहानपणी आईचे आणि कोरोनात वडिलांचे छत्र हरपलेल्या सांगलीच्या युवराज मिरजकर याने टेम्पो चालवतच स्पर्धा परीक्षांची तयारी करून सहायक गटविकास अधिकारी म्हणून यश मिळविले. पण पद नियुक्ती न मिळाल्याने दोन वेळच्या अन्नासाठी ते आजही टेम्पोच चालवितात.

नांदेडची पूजा घेते खासगी क्लास

बालविकास परियोजना अधिकारी म्हणून नांदेडच्या पूजा हिची निवड झाली. पद नियुक्ती न मिळाल्याने कुटुंबाची घडी विस्कटू लागली. आता घरातच दहावीचे खासगी क्लास घेऊन ती उदरनिर्वाह करत आहे.


स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पदनियुक्ती न झाल्याने अनेक नातेवाइकांसह मित्रांच्याही संशयी नजरा आमच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. न्यायालयीन प्रक्रियेतील अडथळे दूर झाले असून, आता कोणतेही कारण न सांगता रखडलेल्या नियुक्त्या करणे आवश्यक आहे. - अजय ढाणे, प्रतीक्षा यादीतील उमेदवार

Web Title: Despite success in 'MPSC', the job of a security guard 623 officers in the state are waiting for appointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.