अस्थिर लोकसंख्या असतानाही स्वच्छता क्षेत्रात पाचगणीचे काम अभिमानास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:29 AM2021-07-17T04:29:21+5:302021-07-17T04:29:21+5:30
पाचगणी : ‘जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि शैक्षणिक केंद्र असूनही अस्थिर लोकसंख्येमुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करून पाचगणी शहराने स्वच्छता क्षेत्रात ...
पाचगणी : ‘जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि शैक्षणिक केंद्र असूनही अस्थिर लोकसंख्येमुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करून पाचगणी शहराने स्वच्छता क्षेत्रात आदर्शवत काम उभारले आहे. या पालिकेची स्वच्छता क्षेत्रातील कामगिरी प्रशंसनीय आहे. त्यामुळे पाचगणीला सर्वतोपरी सहकार्य करु,’ असे अभिवचन स्वच्छ भारत मिशन संचालक बिनयकुमार झा यांनी दिले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत पाचगणी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प भेटीसाठी झा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथक पाचगणी शहरात आले होते. यावेळी नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पालिकेने राबविलेले विविध उपक्रम या पथकाला दाखवले. पालिकेने उभारलेल्या स्वच्छ भारत पॉईंटचेही झा यांनी तोंड भरून कौतुक केले.
यावेळी या पथकाने पाचगणीत शंभर टक्के कचरा विलगीकरण होतो का, याची पाहणी केली. कचरा विलगीकरणाबाबत पालिकेने राबविलेल्या उपक्रमाची झा यांनी विस्तृत माहिती घेतली. सार्वजनिक शौचालये, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्याचे विघटन, एसटीपी प्लांटची पाहणी या पथकाने केली. शहरातील संपूर्ण स्वच्छतेचीदेखील झा यांनी माहिती घेतली. स्वच्छ भारत पॉईंटवर उभारण्यात येणाऱ्या बायोगॅस प्रकल्पाचीही त्यांनी माहिती घेतली.
यावेळी झा यांनी पालिका प्रशासनाने स्वच्छता अभियानात सातत्य ठेवल्याबद्दल नगराध्यक्ष व कर्मचारी, पर्यटक आणि पाचगणीकरांचे विशेष कौतुक केले. तसेच पाचगणी पालिकेच्या नाविन्यपूर्ण तसेच अनुकरणीय उपक्रमांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे अभिवचनदेखील झा यांनी दिले.