मतदान कार्ड असूनही ‘ते’ मतदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:19 PM2019-04-18T23:19:21+5:302019-04-18T23:19:30+5:30
सातारा : तृतीयपंथी म्हणून स्वतंत्र मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या नोंदी मतदान ओळखपत्रावरही येणं अपेक्षित असतं. सातारा जिल्ह्यात तर ६३ जणांकडे ...
सातारा : तृतीयपंथी म्हणून स्वतंत्र मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या नोंदी मतदान ओळखपत्रावरही येणं अपेक्षित असतं. सातारा जिल्ह्यात तर ६३ जणांकडे तृतीयपंथी म्हणून मतदान ओळखपत्र आहे. मात्र, मतदार यादीत नाव असल्याची खात्री न केल्याने शासन दरबारी अवघ्या १७ जणांचीच नोंद झाली आहे. त्यामुळे फक्त १७ तृतीयपंथीयांना माढा आणि सातारा मतदार संघात मतदान करता येणार आहे.
सामाजिक दडपण, ओळख लपविण्याचा प्रयत्न आणि तृतीयपंथी म्हणून समाजातून होणाऱ्या प्रश्नांचा भडीमार टाळण्यासाठी अनेक तृतीयपंथी स्वत:ला पुरुष म्हणवतात. या सामाजिक घुसमटीमुळे अस्वस्थ होणारे अनेकजण तृतीयपंथीयांसाठी काम करणाºया संस्थांशी जोडले गेले आहेत.
या संस्थांमध्ये येऊन त्यांनी स्वत:ला तृतीयपंथी म्हणून घोषित केले आहे; पण ही बाब सार्वजनिक होऊ नये, यासाठीची गोपनियताही जपली. काहींनी मात्र समाज आणि नातेवाइकांना झुगारून आपल्या मनाचा कौल ऐकून स्वत:ला तृतीयपंथी म्हणून जाहीर केलं. तृतीयपंथी व वेश्या व्यवसाय करणाºया महिलांकरिता काम करणाºया ‘संग्राम’ या संस्थेकडे जिल्ह्यात सुमारे ६७ जणांनी तृतीयपंथी म्हणून स्वत:ची अधिकृत नोंद केली आहे.
यातील ६३ जणांना तृतीयपंथी म्हणून मतदान ओळखपत्रही शासनाकडून प्राप्त झाले आहे. मात्र, शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीत जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची संख्या अवघी १७ दिसत आहे.
खासगी संस्था आणि शासकीय यंत्रणेतील ही तफावत मोठी दिसतेय. त्यामुळे ६३ पैकी अवघ्या १७ जणांची नोंद शासनाकडे असेल तर उर्वरितांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे.
ओळख लपविण्याचा प्रयत्न
तृतीयपंथीयांसाठी काम करणाºया काही संस्थांकडील नोंदणी पाहिल्या. त्यावेळी त्यांच्याकडील आणि शासनाकडे उपलब्ध आकडेवारीत तफावत आढळते. याचं मुख्य कारण ओळख लपविण्याचा प्रयत्न असेही सांगण्यात येत आहे. जे तृतीयपंथी साडी नेसतात, त्यांनी महिला म्हणून आणि जे पुरुषांसारखे कपडे घालतात त्यांनी पुरुष म्हणून नोंद केल्याचीही माहिती पुढे येत आहे.
मतदान ओळखपत्र दिल्यानंतर मतदार यादीत नाव तपासण्याची जबाबदारी संबंधित मतदारांची असते, अशी सूचनाही त्या ओळखपत्रावर दिलेली आहे. जिल्ह्यातील बहुतांश तृतीयपंथी अनेक ठिकाणी भटकंती करत असतात. त्यामुळे त्यांना एका ठिकाणी संपर्क करणं अवघड जातं. बहुदा याच कारणामुळे मतदार नोंदणी कार्यक्रमात ते ट्रॅक झाले नाहीत. परिणामी मतदान ओळखपत्र असूनही मतदार यादीत नाव न तपासल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.
तालुक्यातील
मतदार
वाई २
कोरेगाव ०
कºहाड उत्तर १
कºहाड दक्षिण २
पाटण ३
सातारा ८
फलटण १
माण ०