फार्महाऊसवरील साहित्य चोरणारी टोळी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 04:06 PM2020-01-14T16:06:18+5:302020-01-14T16:07:50+5:30
फार्महाऊसवरील साहित्य चोरणाऱ्या टोळीकडून स्थानिक गुन्हे शाखेने ३ लाख २५ हजारांचा ऐवज जप्त केला असून, पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
सातारा : फार्महाऊसवरील साहित्य चोरणाऱ्या टोळीकडून स्थानिक गुन्हे शाखेने ३ लाख २५ हजारांचा ऐवज जप्त केला असून, पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
रोहित संतोष मोहिते (वय २०), विवेक उर्फ मुंगव्या विलास कांबळे (वय २२, रा. नागठाणे, ता. सातारा), ज्योतीराम उर्फ चाणक्य बबन ढाणे (वय ३४, रा. पाडळी, ता. सातारा), अमोल संभाजी मोरे (वय २२, रा. पाडळी रोड, नागठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मालवाहू टेम्पोतून चोरीचा ऐवज नागठाणे येथे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नागठाणे रविवारी सायंकाळी सापळा लावला. मालवाहू टेम्पोतून वरील चौघे साताऱ्याकडे येत होते.
यावेळी पोलिसांनी टेम्पो अडवून संबंधितांना ताब्यात घेतले. त्यांच्या टेम्पोमध्ये सेंद्रिय खतांची पोती, केमिकलच्या बादल्या, इन्व्हटर, बॅटऱ्या, गॅस शेगड्या आदी साहित्य सापडले. हे साहित्य या टोळीने पाडळी, ता. सातारा गावच्या हद्दीतील एका फार्महाऊसवरून चोरल्याची कबुली पोलिसांना दिली.
दुसरे साहित्य निनाम पाडळी येथील पोल्ट्रीवरून चोरल्याचे तपासात समोर आले आहे. या ठिकाणाहून या टोळीने तारांचे १८ बंडल चोरले होते. हे बंडलही पोलिसांनी जप्त केले आहेत. बोरगाव पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल होते. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंह साबळे, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, सहायक फौजदार विलास नागे, ज्योतीराम बर्गे, पोलीस नाईक मोहन नाचन, संतोष जाधव, योगेश पोळ, प्रवीण कडव, गणेश कापरे, धीरज महाडिक, केतन शिंदे, वैभव सावंत, अनिकेत जाधव, गणेश कचरे, पंकज बेचके यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला.