देऊर-बिचुकले रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी : कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:39 AM2021-04-24T04:39:23+5:302021-04-24T04:39:23+5:30
वाठार स्टेशन : देऊर-बिचुकले गावांना जोडणारा पक्का रस्ता व्हावा ही गेल्या अनेक वर्षांपासूनची दोन्ही गावांची मागणी अखेर मंजूर झाली ...
वाठार स्टेशन : देऊर-बिचुकले गावांना जोडणारा पक्का रस्ता व्हावा ही गेल्या अनेक वर्षांपासूनची दोन्ही गावांची मागणी अखेर मंजूर झाली असून, २८०० मीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामास प्रत्यक्षात सुरुवात केली असून, लवकरच या दोन्ही गावांना जोडणारा मजबूत रस्ता तयार होणार आहे, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम यांनी शुक्रवारी देऊर येथे पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शासन उद्योग व अपारंपरिक ऊर्जाअंतर्गत देऊर-बिचुकले गावाच्या २८०० मीटर लांबीच्या रस्त्याचे काम सुरू झाले असून, या कामासाठी अंदाजे २ कोटी ७५ लाख ३८ हजार ८४४ रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असून, या कामासाठी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी निधी मंजूर करून दिला आहे.
देऊरपासून बिचुकले, नलवडेवाडी, गुजरवाडी गावांना या रस्त्याचा फायदा होणार आहे. या गावातील शाळकरी मुले तसेच शेतीसाठीही हा रस्ता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे चेअरमन धनसिंग कदम, सरपंच शामराव कदम, अजित कदम, प्रकाश देशमुख, वसंत कदम उपस्थित होते.
(कोट)
देऊर-बिचुकले हा जुना कच्चा रस्ता होता. मात्र अनेक ठिकाणी या रस्त्यावर अडचणी असल्याने लोकसहभागातून नव्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी देऊर-बिचुकले गावातील शेतकऱ्यांनी विनामोबदला जमिनी देऊन सहकार्य केल्यामुळेच हा रस्ता मार्गी लागला आहे.
- शामराव कदम, सरपंच, देऊर