हद्दवाढीच्या विकासासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:51+5:302021-06-24T04:26:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा पालिकेची सात महिन्यांपूर्वी हद्दवाढ झाली आहे. हद्दवाढ होण्यापूर्वी हद्दीबाहेरील ग्रामीण नागरी क्षेत्राकरिता लोकसंख्येनुसार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा पालिकेची सात महिन्यांपूर्वी हद्दवाढ झाली आहे. हद्दवाढ होण्यापूर्वी हद्दीबाहेरील ग्रामीण नागरी क्षेत्राकरिता लोकसंख्येनुसार १५ व्या वित्त आयोगाची २ कोटी ९२ लाख ६७ हजार १७० रुपये ही रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली आहे. हद्दवाढ झालेल्या या भागाच्या विकासाकरिता ही रक्कम सातारा पालिकेकडे वर्ग करण्यात यावी, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.
मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे आहेत. त्यांची कामाची एक वेगळी शैली आहे. त्यांना आम्हीच काय कोणीही कधीही भेटू शकतो. त्यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधामुळेच त्यांना भेटत आहोत असे स्पष्ट करून, मंत्री मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात खा. उदयनराजे यांनी नमूद केले आहे की, सन २०२०-२१ करिता, शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर अनुक्रमे १०:१०:८० टक्के या प्रमाणात बंधित निधीचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे.
आठ महिन्यांपूर्वी सातारा पालिकेची हद्दवाढ करण्यात आली आहे. नव्याने हद्दीत समाविष्ट झालेल्या भागाचा १५ व्या वित्त आयोगाचा निधी सक्षम प्राधिकरण म्हणून सातारा नगर परिषदेकडे वाढीव भागाच्या विकासाकरिता वर्ग करणे आवश्यक आहे. सध्या जिल्हा परिषदेकडे सदरचा निधी अखर्चित आहे. हा निधी सातारा पालिकेकडे वर्ग करण्याबाबत आपण जिल्हा परिषदेस योग्य त्या सूचना निर्गमित कराव्यात, अशी मागणी खा. उदयनराजे यांनी केली आहे. यावेळी रॉबर्ट मोझेस, काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर, विनीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.