सर्वसामान्य जनतेचा विकास हाच ध्यास : जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:58 AM2021-02-23T04:58:01+5:302021-02-23T04:58:01+5:30
खंडाळा : ‘भादे गावामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वाधिक विकासकामे झाली आहेत. गावची सत्ता कोणाकडे आहे याचा कधीही ...
खंडाळा : ‘भादे गावामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वाधिक विकासकामे झाली आहेत. गावची सत्ता कोणाकडे आहे याचा कधीही विचार न करता सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे असे मानून काम केले. कामांचा स्रोत पोहचला पाहिजे हाच ध्यास कायम ठेवला,’ असे मत पंचायत समिती सदस्या शोभा जाधव यांनी व्यक्त केले.
भादे येथे पंचायत समिती सदस्या शोभा जाधव यांच्या प्रयत्नातून गावातील दत्त मंदिर परिसर बंदिस्त गटार, जगताप वस्ती रस्ता, गावातील अंतर्गत रस्ता व बिरोबा मंदिर ते मळवीपर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच निलांबरी बुनगे, उपसरपंच विशाल गायकवाड, बाळासाहेब जाधव, संभाजी साळुंखे, बापू साळुंखे, बाळूभाऊ साळुंखे, ग्रामपंचायत समितीचे सदस्य आनंद गायकवाड, मालन चव्हाण, चित्रा खुंटे, संतोष साळुंखे, संजय ठोंबरे, आशा गायकवाड उपस्थित होते.
शोभा जाधव म्हणाल्या, ‘पंचायत समितीच्या गेल्या चार वर्षांच्या कालखंडात विकासकामे करताना गणातील कोणत्याही गावात दुजाभाव केला नाही. समस्या सोडविण्यासाठी योजना आखल्या त्यामुळेच सर्वांगीण विकासाचे ध्येय गाठता आले. आगामी काळात उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.