आधुनिक वाण वापरले तर शेतीचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:42 PM2018-02-18T23:42:40+5:302018-02-18T23:42:54+5:30
लोणंद : ‘देशाची लोकसंख्या वाढली त्या प्रमाणात शेती व्यवसाय वाढला नाही. शेतीत बदल करून नवीन संकरित बियाणे, अवजारे, आधुनिक पिकांचे वाण व शेती जोड व्यवसाय स्वीकारले पाहिजेत. कमी पाण्यावर व कमी वेळेत येणाºया उसाच्या जाती आल्या तरच महाराष्ट्र नंबर एकवर जाईल,’ असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
लोणंद येथे आयोजित शरद कृषी महोत्सव व प्रदर्शनात ते बोलत होते. यावेळी शिक्षण सभापती राजेश पवार, समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, जिल्हा परिषद सदस्या दीपाली साळुंखे, उदय कबुले, सभापती मकरंद मोटे, राजेंद्र तांबे, तेजस शिंदे, डॉ. नितीन सावंत तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, ‘कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेती, कला, विज्ञान क्षेत्रात नवीन काही करण्याचा प्रयत्न खंडाळा तालुक्याने केला आहे. शेती क्षेत्रात आधुनिकता येण्यासाठी प्रदर्शन महत्त्वपूर्ण आहे. खंडाळा तालुक्याने माझ्यावर नेहमीच प्रेम केले आहे. सातारा जिल्ह्याच्या वतीने नागरी सत्कार झाला असताना केवळ लोणंदकरांचे प्रेम गप्प बसू देत नसल्यानेच हा दुसरा सन्मान झाला, त्याचा आदर आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने प्रेरित होऊन या तालुक्याने मला साथ दिली.’
मकरंद पाटील म्हणाले, ‘या महोत्सवामुळे खंडाळा तालुक्याचे स्वप्न साकार झाले. कृषी, सहकार, राजकारणासह सर्वच क्षेत्रात शरद पवार यांनी ठसा उमटविला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचं कामकाज उत्तम सुरू आहे. कृष्णेचं पाणी आल्यानं खंडाळ्याचा दुष्काळ हटला. शेती पाण्याबाबत स्वयंपूर्णता आली. आता औद्योगिकरण झाल्याने हा सर्वात प्रगत तालुका होईल.’
मनोज पवार म्हणाले, ‘या भागात पाणी पोहोचल्याने आता शेती समृद्ध करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती प्रदर्शनातून मिळेल. शेतकºयांसाठी जिल्हा परिषदेतर्फे सुविधा देण्यात येणार आहेत.’
यावेळी डॉ. नितीन सावंत, दत्तात्रय बिचकुले, रमेश शिंदे, नगरसेवक योगेश क्षीरसागर, हणमंत शेळके, दीपाली क्षीरसागर, सागर शेळके, संभाजी घाडगे, भिकूदादा कुरणे, गजेंद्र मुसळे यांच्यासह लोणंद, वाई, फलटण, कोरेगाव पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. नितीन सावंत यांनी प्रास्ताविक केले. हणमंत शेळके यांनी आभार मानले.
मकरंद पाटलांमुळे गती
‘खंडाळ्यासह दुष्काळी भागाला पाणी मिळावे, यासाठी रामराजेंनी मंत्री काळात पुढाकार घेतला. मकरंद पाटील यांनी त्याला गती दिली. त्यामुळेच कृष्णेचं पाणी पोहोचू शकले. आता सत्तर टक्के जमीन पाण्याखाली आल्याने बारामतीपेक्षा अधिक विकास होईल.’ कृषी महोत्सव दरवर्षी होणार असल्याने परदेशातील नवीन तंत्रज्ञान पुरविण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’ अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली.