फलटणमधील ऐतिहासिक अन् पर्यटनस्थळांचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:41 AM2021-07-28T04:41:06+5:302021-07-28T04:41:06+5:30
फलटण : राज्यातील विविध पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी विविध योजना आखलेल्या आहेत. त्यामध्ये फलटणला मध्यवर्ती ...
फलटण : राज्यातील विविध पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी विविध योजना आखलेल्या आहेत. त्यामध्ये फलटणला मध्यवर्ती केंद्र मानून फलटणसह आजूबाजूच्या पर्यटन स्थळांचा विकास साधायचे निश्चित केलेले आहे. फलटणसह आजूबाजूच्या गावांमधील ऐतिहासिक व पर्यटनाच्या दृष्टीने योग्य असलेली स्थळे ही आगामी काळामध्ये पर्यटन स्थळे म्हणून विकसित करण्यात येणार आहेत, अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण येथील "मुधोजी मनमोहन राजवाडा" येथे एका कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटण नगरपरिषदेच्या ज्येष्ठ नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, छत्रपती विक्रमसिंहराजे भोसले, सद्गुरू उद्योग समूहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, मंगेश दोषी, नगरसेवक अजय माळवे, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
रामराजे म्हणाले की, फलटणमधील ऐतिहासिक असलेल्या श्री मुधोजी मनमोहन राजवाडा, नागेश्वर मंदिर, श्रीराम मंदिर, जबरेश्वर मंदिर, महानुभव पंथाची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेले चक्रधर स्वामी मंदिर, आबासाहेब मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, जैन धर्मीयांचे श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, धनगर समाजाचे दैवत समजले जाणारे श्री बिरदेव मंदिर, श्री भिवाई माता मंदिर, श्री धुळदेव मंदिर यांचा समावेश एका डॉक्युमेंट्रीमध्ये करण्यात येणार आहे. याशिवाय महाराष्ट्राचे लोकनृत्य समजले जाणारे धनगर समाजाचे गजीनृत्यसुद्धा या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवले जाणार आहे.
फलटणमधील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले फलटण तालुक्यामधील करण्यात येणारे शेती प्रकारसुद्धा या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवण्यात येणार आहेत. फलटण तालुक्यामधील विविध फळबागांची माहिती यात समाविष्ट करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने डाळिंब, द्राक्षे व प्रगतशील उसाच्या शेतीची माहितीसुद्धा देण्यात येणार आहे, असेही यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
वेळापूर, ता. माळशिरस येथील अर्धनारीनटेश्वर, सातारा तालुक्यातील लिंब येथील बारामोटेची विहीर, औंध तालुक्यातील खटाव येथील मूळपीठ श्री यमाई मंदिर, वास्तू संग्रहालय, शिखर शिंगणापूर, ता. माण येथील श्री शंभू महादेवाचे मंदिर, गोंदवले ता. माण येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे समाधी मंदिर यांचा समावेशसुद्धा या डॉक्युमेंट्रीमध्ये करण्यात येणार आहे. आगामी काळामध्ये फलटणसह परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने परिपूर्ण विकास साधण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.