माणमधील गाव कारभाऱ्यांना विकासाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:37 AM2021-03-21T04:37:50+5:302021-03-21T04:37:50+5:30
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील ९५ गावांपैकी पहिल्या टप्प्यात ६१ गावांमधील सरपंच, उपसरपंचांची निवड करण्यात आली. त्यापैकी १४ गावांच्या ग्रामपंचायती ...
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील ९५ गावांपैकी पहिल्या टप्प्यात ६१ गावांमधील सरपंच, उपसरपंचांची निवड करण्यात आली. त्यापैकी १४ गावांच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर ४७ ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून सरपंच, उपसरपंचांची निवड करण्यात आली. गावाच्या सर्वांगिण विकासाची आणि स्वतःचेही राजकीय करियर घडविण्याची संधी सरपंचांसह सदस्यांना यानिमित्ताने मिळाली आहे.
पंधराव्या वित्त आयोगातून माण तालुक्यातील ग्रामपंचायतींकरिता सुमारे ७ कोटी २७ लाख १८ हजार ७०८ रुपये एवढा निधी मिळणार आहे. मतभेद विसरत सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास हिवरे बाजार, पाटोदा या गावांप्रमाणे अन्य गावांचा विकास करणे शक्य होणार आहे.
गावोगावी सरपंच, उपसरपंच निवडीनंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. सरपंच, उपसरपंचपदी निवडून आलेल्यांमध्ये तरुणांची संख्या अधिक आहे. ग्रामस्थांच्या सार्वजनिक गरजा पुरवणे, त्यासाठी वेगवेगळ्या सुविधा निर्माण करणे याकडे लक्ष द्यायला हवे. यासाठी गावात एकोपा असणे आवश्यक आहे. याकरिता सर्व सदस्यांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत कायदे, कार्यपद्धती, अर्थकारण, सरकारी योजना, ग्रामसेवक आणि इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांची गावाप्रति असलेली कर्तव्ये अशा महत्त्वाच्या बाबींची सखोल माहिती प्रत्येक सदस्याला असणे आवश्यक आहे. यासाठी सदस्यांनी स्वत: सर्व बैठकांना पूर्णवेळ उपस्थित राहायला हवे. तसेच बैठकीत आधी झालेल्या निर्णयांचा आढावा घ्यायला हवा. ग्रामसभांना जास्तीत जास्त ग्रामस्थ उपस्थित कसे राहतील, ग्रामविकासात लोकांचा सहभाग कसा वाढेल, ते पाहायला हवे. गेल्या काही वर्षांत हिवरेबाजारचे सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार आणि पाटोद्याचे माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांचे नाव घेतले जाते. त्यांनी गावाच्या सर्वांगिण विकासाचा पॅटर्न तयार करुन अंमलात आणला आहे. त्याच पद्धतीने प्रयत्न गरजेचे आहेत.
कोट :
माण तालुक्यात नवीन धोरणात्मक राबविता येण्यासारखे खूप उपक्रम आहेत. त्यापैकी कुपोषणमुक्त अंगणवाडी, ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी, फळझाडांची लागवड, शाळेत ई-लर्निंग सुविधा, सामाजिक जागृती सप्ताह, सामुदायिक विवाह, व्यसनमुक्तीपर समाजप्रबोधनपर व्याख्याने यासारखे उपक्रम राबवून सरपंचांनी गावे समृद्ध करावीत.
- मंदाकिनी सावंत,
सरपंच, पुळकोटी
(सचिव, महाराष्ट्र सरपंच परिषद, पुणे)
फेट्याचा फोटो वापरणे...