देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, एक जण ठार तर दोन जण किरकोळ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 07:25 PM2022-10-02T19:25:03+5:302022-10-02T19:25:12+5:30
उलटी व मळमळ झाल्यामुळे चालकाने कार रस्त्यालगत थांबलली, यावेळी टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिली.
शिरवळ- कोल्हापूर येथील देवीचे दर्शन घेऊन पुण्याकडे निघालेल्या कार चालकाला उलटी व मळमळल्यागत होत असल्याने, त्याने कार महामार्गालगत बाजूला घेतली. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील पंढरपूर फाटा याठिकाणी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने कारला जोरदार धडक दिल्याने एक जणाचा मृत्यू तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहे.
यामध्ये प्रशांत भास्करराव क-हाळे (वय 47,रा.रावेत ता.हवेली जि.पुणे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना रविवार दि.2 आँक्टोंबर रोजी पहाटे 3.20 च्या दरम्यान घडली. याबाबतची घटनास्थळावरुन व शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आकुर्डी,पुणे येथील डि.वाय.पाटील एमबीए महाविदयालय याठिकाणी विविध पदांवर कार्यरत असलेले अरुण बाबू पाटील, संदिप नारायण पाटील,प्रशांत भास्करराव क-हाळे,सोमनाथ मारुती हडलगेकर,विशाल तानाजी माने हे मिञ कोल्हापूर याठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते.
यावेळी कोल्हापूर येथे देवीचे व जोतिबाचे दर्शन घेऊन पुणे बाजूकडे कार (क्रं- एमएच-14-केबी-0591)मधून परतत असताना कारचालक अरुण पाटील यांना अचानकपणे उचकी व शिंका येत उलटी होऊ लागल्याने शिरवळ ता.खंडाळा येथील पंढरपूर फाटा येथील महामार्गालगत कार थांबवत खाली उतरले. यावेळी कारमध्ये पाठिमागे बसलेले प्रशांत क-हाळे हे कारचालकाच्या दरवाज्याजवळ येऊन थांबले असताना सातारा बाजूकडून पुणे बाजूकडे भरधाव वेगाने निघालेल्या टेम्पो (क्रं-एमएच-04-एचवाय-3873)ने कारला पाठिमागून जोरदार धडक दिल्याने महामार्गालगत असणा-या नाल्यामध्ये जात कारजवळील प्रशांत क-हाळे हे गंभीर जखमी झाले तर सोमनाथ हडलगेकर व विशाल माने हे किरकोळ जखमी झाले आहे.
गंभीर जखमी झालेल्या प्रशांत क-हाळे यांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला.यावेळी प्रशांत क-हाळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.यावेळी कारचे व टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यावेळी अरुण पाटील यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन टेम्पोचालक बंदेनवाज गुलाब शेख (रा.भिवंडी,ठाणे) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार,पोलीस अंमलदार संजय सकपाळ,शिवराज जाधव हे करीत आहे. छायाचिञ- शिरवळ येथे अपघातामध्ये चक्काचूर झालेली कार..!(छाया-मुराद पटेल,शिरवळ)