Mahashivratri: सह्याद्रीच्या उंच डोंगररांगा, चित्तथरारक गिर्यारोहणाचा अनुभव घेत हजारो भक्त नागेश्वराच्या चरणी
By सचिन काकडे | Published: March 8, 2024 05:19 PM2024-03-08T17:19:09+5:302024-03-08T17:21:20+5:30
'हर हर महादेव'च्या जयघोषाने भक्तांमध्ये चैतन्य संचारले
सातारा : कोयनेचे घनदाट जंगल पाहता क्षणी दरदरून घाम फोडणाऱ्या सह्याद्रीच्या उंच डोंगररांगा, घसरड्या पाऊलवाटा अशा चित्तथरारक गिर्यारोहणाचा अनुभव घेत हजारो भक्त शुक्रवारी किल्ले वासोट्याजवळ असलेल्या नागेश्वराच्या चरणी नतमस्तक झाले. 'हर हर महादेव'च्या जयघोषाने भक्तांमध्ये चैतन्य तर संचारलेच शिवाय महाशिवरात्रीला भक्ती आणि शक्तीचा संगमही पाहायला मिळाला.
सातारा जिल्ह्यात महाशिवरात्री धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या महादेव मंदिरांमध्ये भाविकांनी सकाळपासूनच रांगा लावून महादेवाचे दर्शन घेतले. किल्ले वासोट्याजवळील उंच सुळक्यावर असलेले नागेश्वराचे मंदिर हजारो शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. या नागेश्वराच्या दर्शनासाठी सातारा, रत्नागिरी तसेच अन्य जिल्ह्यांतील हजारो भक्तांनी शुक्रवारी हजेरी लावली. भक्तांना दर्शन घेता यावे म्हणून तापोळा, बामणोली, मुनावळे येथून बोटींची व्यवस्था करण्यात आली होती.
सकाळपासूनच हजारो भाविक नागेश्वराच्या दिशेने रवाना झाले. जलसफारी, जंगलसफारीचा थरारक अनुभव घेत भक्त नागेश्वराच्या पायथ्याला पोहोचले. दर्शनासाठी मंदिरापासून दूर अंतरापर्यंत भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. हजारोंच्या संख्येने आलेल्या भक्तांनी नागेश्वराचे दर्शन घेत परतीचा प्रवास पार पाडला. वनविभागाकडून भक्तांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली.