देऊरला मुधाई देवीच्या सोहळ्यात ढोल-ताशांचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:49 PM2017-10-01T13:49:44+5:302017-10-01T13:50:17+5:30
वाठार स्टेशन : हालगीचा कडकडाट.. ढोल-ताशांचा गजर, शिंगाड्यांची सलामी आणि अस्ते तपोवस्ते नजर खो मेहरबानच्या ललकारीने देऊर, ता. कोरेगाव येथील मुधाई देवी परिसर दणाणून गेला. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे प्रतिरूप आणि महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतील लाखो भाविक-भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुधाई देवीचा पालखी सोहळा हजारो भाविक-भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी दर्शनासाठी रांग लागली होती.
महाराष्ट्राची वैष्णोदेवी म्हणून नावलौकिकता असलेली देऊरची मुधाई देवी हे सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. स्वयंभू, जागृत, नवसाला पावणारी अशी महिमा असलेल्या या देवीची नवरात्रात मोठी यात्रा भरते. या दिवशी राज्यभरातून भाविक-भक्त देवीच्या दर्शनासाठी देऊरमध्ये गर्दी करतात. या दिवशीच्या पालखीचा मान हा मुधाई भक्त मुधोजी चव्हाण यांचा असल्याने दहिगावचे चव्हाण कुटुंबीय या दिवशी पालखी सोहळ्यास उपस्थित असतात. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता दहिगाव ग्रामस्थांच्या मुख्य उपस्थितीत हा पालखी सोहळा पार पडला.
यावेळी पारंपरिक हलगी व ढोल-ताशा, बँड यांच्या निनादात, फटाक्यांच्या आतषबाजीत मुधाई देवीच्या पालखीचे देऊरकर ग्रामस्थांनी स्वागत केले. पालखी मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी रांगोळी काढली होती. दुपारी दोनच्या सुमारास देवीची पालखी मंदिरात पुन्हा आल्यानंतर सर्वांनी भक्तिभावाने देवीचे दर्शन घेतले. देवीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
रांगेतील भाविकांसाठी देऊर येथील जय तुळजाभवानी गणेशोत्सव मंडळ, होळीचा टेक मित्र मंडळ, दहिगाव येथील जय मुधाई प्रतिष्ठाण, उमाजी नाईक मित्र मंडळ या मंडळांनी पाणी, चहा व उपवासाच्या पदार्थांचे वाटप केले. भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, यासाठी मुधाई हायस्कूलमधील स्वयंसेवक, स्वयंसेविका तसेच वाठार पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.