धबाबातोय आदळे! पश्चिम घाट ओलाचिंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:25 AM2021-06-23T04:25:35+5:302021-06-23T04:25:35+5:30
पश्चिम घाटात मुसळधार पाऊस चांगलाच रमला असून दिवसभर धुक्याची दुलई पसरलेली दिसत आहे. दाट धुके अन् त्यात हरवलेल्या निसर्गरम्य ...
पश्चिम घाटात मुसळधार पाऊस चांगलाच रमला असून दिवसभर धुक्याची दुलई पसरलेली दिसत आहे. दाट धुके अन् त्यात हरवलेल्या निसर्गरम्य डोंगरातून धबधबे कोसळत आहेत. ठोसेघर तसेच एकीव, भांबवलीपर्यंत असंख्य लहानमोठे धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळत आहेत. सातारा-बामणोली मार्गावर आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठार परिसरात मागील आठवड्यात मुसळधार पाऊस होऊन सध्या पावसाची रिमझिम सुरू आहे. तसेच अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी पडत असल्याने छोटे मोठे धबधबे फेसाळले आहेत.
शहराच्या पश्चिमेस एकीव, दूंद, कास पठार परिसर, भांबवली येथील कित्येक धबधबे मोठ्या प्रमाणावर फेसाळू लागले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे बंद असतानादेखील या धबधब्यासमवेत अनेक पर्यटक पावसात भिजत फोटोसेशन करत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात यंदा माॅन्सूनने वेळेपूर्वी हजेरी लावली असली तरी सध्या कास परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. कास पठारावर कास तलावाकडे जात असताना असलेल्या वळणावर छोट्या प्रमाणात धबधबा कोसळू लागला आहे. छोटेमोठे कोसळणारे धबधबे चोहोबाजूला हिरवीगार दाट झाडी पावसाच्या अधूनमधून कोसळणाऱ्या सरी, वेगाने वाहणारा वारा त्यात सर्वत्र पसरलेले धुके डोळ्याचे पारणे फेडत आहेत.
चौकट
मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने कास पठाराच्या सड्यावरून पाणी वाहू लागल्याने तलावाकडे जाणाऱ्या पठारालगत असणारा छोटा धबधबा तसेच सड्यावरून पूर्वेला वाहणाऱ्या पाण्यामुळे पारंबे फाट्यापासून उजवीकडे ४ किमी अंतरावरील एकीव धबधबा कोसळत आहे. यामुळे कण्हेर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. भांबवलीसह यवतेश्वर घाटातही धबधबा कोसळून कास पठार परिसरात अनेक छोटेमोठे धबधबे दर्शन देऊ लागले आहेत. येथील दाट धुक्यात रिमझिम पडणारा पाऊस मन हेलावून टाकत आहे.
( एकीव ता. जावळी येथील फेसाळलेला धबधबा . छाया -सागर चव्हाण )