LokSabha 2024: मोहिते-पाटील यांच्यावरच राष्ट्रवादीचं माढ्याचं गणित; शरद पवार कोणती खेळी खेळणार
By नितीन काळेल | Published: April 6, 2024 05:57 PM2024-04-06T17:57:32+5:302024-04-06T17:57:32+5:30
माढ्याचा उमेदवार लवकरच निश्चित होणार
सातारा : माढा मतदारसंघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीतून धैर्यशील मोहिते-पाटील की संजीवराजे तुतारी वाजविणार यावर खल सुरू आहे. तसेच अभयसिंह जगताप यांचेही नाव पुढे येत आहे. यामुळे शरद पवार कोणती खेळी खेळणार यावरच उमेदवार निश्चिती होणार आहे. तरीही मोहिते यांच्या भूमिकेवरच राष्ट्रवादीचं माढ्याचं सर्वच गणित अवलंबून असणार आहे.
माढा मतदारसंघासाठी महायुतीतील भाजपने उमेदवार जाहीर करून १५ दिवस होत आले आहेत. पक्षाने पुन्हा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर विश्वास दाखवला आहे. पण, खासदारांना महायुतीतूनच जोरदार विरोध आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे रामराजे नाईक-निंबाळकर यांचा विरोध मावळलेला नाही. त्यामुळे ते सतत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत, तर अकलूजचे मोहिते-पाटील यांनी निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली आहे.
भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढलाय. गावोगावी भेटी देऊन चाचपणी केली आहे. ते निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यामुळेच बुधवारी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटही घेतली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रथमच त्यांनी ही भेट घेतल्याने धैर्यशील यांनी एक पाऊल पुढे टाकल्याचे सांगण्यात येत आहे.
कारण, माढ्यात भाजपसमोर मोहिते-पाटील यांच्या घरातील उमेदवाराशिवाय तगडे आव्हान उभे राहणार नाही हे पवार यांनाही माहीत आहे. त्यामुळेच त्यांनी आतापर्यंत उमेदवारीबाबत सावध भूमिका घेतली होती. आता धैर्यशील यांनी भेट घेतल्याने पवार यांना पुढील निर्णय घेणे सोपे होणार आहे. त्यातच धैर्यशील मोहिते यांनीही आपल्या अडचणी पवार यांना सांगितल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप सोडून धैर्यशील तुतारी हाती कधी घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
माढ्यातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनीही निवडणुकीची तयारी केली आहे. मतदारसंघात अनेक कार्यक्रम घेतले. तसेच शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर अनेकवेळा उमेदवारीबाबत भेटही घेतली. पण, त्यांना अजून हिरवा कंदील मिळालेला नाही. मोहिते-पाटील यांच्याबरोबर चर्चा सुरू असल्याचे सांगत त्यांना थांबविल्याची माहिती मिळत आहे. यामुळे धैर्यशील मोहिते हे राष्ट्रवादीत आल्यास जगताप यांना थांबावे लागणार आहे. सध्या राष्ट्रवादीचा फोकस हा धैर्यशील मोहिते यांच्यावरच आहे. त्यांचा निर्णय पक्का झाला तर तेच उमेदवार राहणार आहेत. या वेगवान राजकीय घडामोडीत राष्ट्रवादीचा माढ्याचा उमेदवार लवकरच निश्चित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रथम क्रमांकावर धैर्यशील नंतर संजीवराजे..
माढा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांच्यात आतापर्यंत तीन ते चार बैठका झाल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाऊन उमेदवारी घेण्याबाबत धैर्यशील मोहिते-पाटील यांचे नाव पहिल्यापासून आघाडीवर आहे. त्यांनीच तुतारी हाती घ्यावी, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असेही आश्वस्त केल्याची माहितीही समोर आलेली आहे. तसेच धैर्यशील माेहिते उमेदवार नसतील तर संजीवराजेंचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण, रामराजे याला तयार होणार का ? यावरच संजीवराजेंची उमेदवारीही अवलंबून असणार आहे.