म्हसवडच्या उपनगराध्यक्षपदी धनाजी माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:06 AM2021-02-05T09:06:02+5:302021-02-05T09:06:02+5:30
म्हसवड : म्हसवडच्या उपनगराध्यक्षपदी धनाजी रामचंद्र माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पालिकेच्या ...
म्हसवड : म्हसवडच्या उपनगराध्यक्षपदी धनाजी रामचंद्र माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पालिकेच्या उपनगराध्यक्ष स्नेहल सूर्यवंशी यांनी पदाचा राजीनामा दिल्याने उपनगराध्यक्ष निवडीसाठीच्या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष तुषार वीरकर यांनी गुरुवारी ऑनलाईन मीटिंग आयोजित केली होती.
या निवडीच्या कार्यक्रमावेळी दुपारी एक ते तीन वेळेत उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये अकिल मैन्नुद्दीन काझी व धनाजी रामचंद्र माने यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, तर सव्वातीन ते साडेतीन अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत अकिल काझी यांनी अर्ज माघारी घेतल्याने धनाजी माने यांची उपनगराध्यक्षपदी निवड निश्चित झाली होती. थोड्या वेळाने नगराध्यक्ष तुषार वीरकर यांनी सभागृहात उपनगराध्यक्षपदी धनाजी माने यांची निवड झाल्याचे जाहीर केले. उपनगराध्यक्षपदी धनाजी माने यांच्या नावाची घोषणा होताच पालिकेसमोर फटाक्यांची आतषबाजी व वाद्यांच्या गजरात समर्थकांच्या उपस्थितीत निवडीचा आनंद साजरा करण्यात आला.
प्रतिक्रिया
भविष्यात जनतेसाठीच काम करणार
मी जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असून या काळात म्हसवड शहरातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार, अशी ग्वाही उपनगराध्यक्ष धनाजी माने यांनी दिली.