धनगर समाजातर्फे सरकार विरोधात जागरण गोंधळ : फलटणमध्ये एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:05 AM2018-08-05T00:05:13+5:302018-08-05T00:07:46+5:30

धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने येथील अधिकारगृह इमारतीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

Dhangar community's public awareness against corruption: Elgar in Phaltan | धनगर समाजातर्फे सरकार विरोधात जागरण गोंधळ : फलटणमध्ये एल्गार

धनगर समाजातर्फे सरकार विरोधात जागरण गोंधळ : फलटणमध्ये एल्गार

googlenewsNext
ठळक मुद्देआंदोलनाच्या सातव्या दिवशी घोषणाबाजी

फलटण : धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने येथील अधिकारगृह इमारतीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या सातव्या दिवशी आंदोलनस्थळी शनिवारी धनगर समाज बांधवांनी राज्य सरकारच्या विरोधात जागरण गोंधळ घातला.

धनगर समाजाला घटनेने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हणमंतराव सूळ यांनी धरणे आंदोलनास भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी हणमंतराव सूळ म्हणाले, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला. परंतु तत्कालीन राज्यकर्त्यांनी जाणून बुजून या आरक्षणापासून धनगर समाजाला वंचित ठेवले आहे. या सरकारने त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. ती त्वरित मान्य होईल ही अपेक्षा या सरकारकडून व्यक्त करू या. धनगर समाज बांधवांचे बेमुदत आंदोलन शहरात गेले सात दिवस सुरू आहे. हे आंदोलन समाजबांधवांनी शांततेच्या मार्गाने करावे. कुठलाही अनुचित प्रकार करून शासनाच्या मालमत्तेचे हानी होईल, असे कृत्ये करू नये.’

या आंदोलनास बारामती पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश गोफणे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश देवकाते, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गुलाबराव देवकाते, संस्थेच्या तसेच विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला.

आपल्या राज्यात ९३ हजार धनगड असल्याचे सांगितले जाते; पण प्रत्यक्ष जिल्हा व तालुक्याची नावे सांगितली जात नाहीत त्यातच आपल्या जिल्हात २७५ धनगड असल्याचे शासकीय स्तरावरून सांगितले जाते; पण ते नेमके कोठे आहेत ही बाब लपविली जात असल्याचे समाज बांधवांनी याप्रसंगी निर्देशित केले.

धनगर समाज आरक्षण आंदोलनाला
खंडाळ्यात सर्वपक्षीय पाठिंबा

खंडाळा : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, यासाठी खंडाळा तहसील कार्यालयावर सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळत आहे. आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवून सरकार दरबारी समाजाच्या भावना पोहोचविण्याचा शनिवारी निर्धार करण्यात आला.

खंडाळा येथे धनगर समाज बांधवांनी आरक्षणासाठी उभारलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलकांनी ठिय्या मांडला होता. त्यास पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. ‘यळकोट यळकोट, जय मल्हार’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं... नाही कोणाच्या बापाचं’ आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या.

धरणे आंदोलनाच्या पहिल्याच रात्री भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित करून आंदोलनाला बळ देण्यात आले. खंडाळा तालुक्यातील प्रत्येक गावातील समाज बांधव टप्प्याटप्प्याने आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Web Title: Dhangar community's public awareness against corruption: Elgar in Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.