धर्मापलीकडच्या माणूसपणाची बक्षीसपत्रावर उमटली मोहर!
By admin | Published: October 16, 2015 09:44 PM2015-10-16T21:44:22+5:302015-10-16T22:40:38+5:30
मुस्लिम दाम्पत्याची ‘इनाम’दारी : मंदिराला दिली २७ गुंठे जमीन -- गूड न्यूज
संजीव वरे- वाई -परधर्माविषयी अनास्था आणि इस्टेटीविषयी गरजेपेक्षा अधिक आस्था दाखविण्याच्या काळात मंदिरासाठी स्वत:ची २७ गुंठे जमीन बक्षिस देऊन मुस्लिम दाम्पत्याने धर्मापलीकडचे माणूसपण दाखवून दिले आहे. वाई तालुक्यातील बेलमाची गावच्या इनामदार दाम्पत्याच्या या दातृत्वाची परिसरात मोठी चर्चा आहे.
स्वत:पुरते पाहण्याची वृत्ती वाढत असताना आणि शेतजमीन विकून गुंठेपाटील बनण्याची स्वप्ने अनेकांना वाकुल्या दाखवीत असताना निजाम कासम इनामदार आणि त्यांच्या पत्नी नजमा यांनी धर्मापलीकडच्या माणूसपणाची मोहर बक्षीसपत्रावर उमटविली आहे. निजाम ७४ वर्षांचे आहेत, तर त्यांच्या पत्नी ६५ वर्षांच्या. मुलगा शहानवाज यांचे २००२ मध्ये अपघातात निधन झाले आणि उतारवयात मोठा आघात या दाम्पत्याने झेलला. ग्रामदैवत भैरवनाथ आणि मंदिराची देखभाल करणारा देवस्थान ट्रस्ट हाच आपला आधार आहे, अशी या दाम्पत्याची धारणा. हीच माणसे आपला सांभाळ करतील, या खात्रीने दाम्पत्याने आपल्या २७ गुंठे जमिनीचे बक्षीसपत्र ट्रस्टच्या नावाने केले आहे.
वाई तालुक्यातील किकलीचे ग्रामदैवत श्रीभैरवनाथाचे मंदिर पांडवकालीन आहे. गावाला मोठा सांस्कृतिक, सामाजिक वारसा आहे. गावाजवळच बेलमाची गावाच्या हद्दीत निजाम इनामदार यांची जमीन आहे. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक बाबर, सचिव गजानन बाबर आणि ग्रामस्थांना ही जमीन विनामोबदला देण्याचे पाऊल इनामदार दाम्पत्याने उचलले, तेव्हा दुय्यम निबंधक एम. बी. खामकर, माजी खासदार गजानन बाबर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. रक्ताच्या नात्यातील माणसांनाही जमीन-जुमल्यासाठी कोर्टात खेचण्याचे प्रकार घरोघरी दिसून येत असताना इनामदार दाम्पत्याचे हे पाऊल सहिष्णुता आणि विवेकनिष्ठ समाजासाठी आग्रही असणाऱ्या प्रत्येकासाठी वंदनीय ठरले आहे.
किकली येथील भैरवनाथ देवस्थान प्रसिद्ध असून, देवस्थानच्या जमिनीच्या उत्पन्नातून देवाची दैनंदिनपूजा, दसरा यात्रा व धार्मिक उत्सवांचा खर्च केला जातो. वार्षिक यात्रेच्या वेळी इनामदार दाम्पत्याचा ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सत्कार करणार आहोत.
- भरत बाबर, विश्वस्त,
भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, किकली