Satara: दिवशी घाट बनली बिकट वाट!, दरड कधी कोसळेल नेम नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 06:10 PM2024-07-24T18:10:35+5:302024-07-24T18:10:57+5:30
सणबूर : दिवशी घाटातून जाताय सावधान...गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने ढेबेवाडी-पाटण रस्त्यावरील दिवशी घाटामध्ये अनेक ठिकाणी दरडी ...
सणबूर : दिवशी घाटातून जाताय सावधान...गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने ढेबेवाडी-पाटण रस्त्यावरील दिवशी घाटामध्ये अनेक ठिकाणी दरडी सुटलेल्या आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने घाटात छोट्या मोठ्या दरडी पडत आहेत. त्यामुळे घाटातून वाहने चालवताना वाहनधारक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मुसळधार पावसामुळे घाटात दरडी पडत असल्याने घाटातून प्रवास करताना धोक्याचे झाले आहे. कोणत्या क्षणी दरड कोसळेल हे सांगता येत नाही. या घाटामध्ये अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या दरडी यापूर्वी कोसळल्या आहेत. सध्या अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती असून प्रवासी व वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
दिवशी घाटामध्ये अनेक ठिकाणी डोंगराचा सुटलेला भाग कधीही ढासळण्याची शक्यता आहे. दिवशी घाट अरुंद व वळणा-वळणाचा असल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी धोक्याचा बनत आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनचालकांना जीवावर दगड ठेवूनच प्रवास करावा लागत आहे. घाटामध्ये अनेक ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
ढेबेवाडी भागातील अनेक गावांना पाटण हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शासकीय कामासाठी तसेच खरेदीसाठी पाटणला जावे लागते. महाविद्यालयीन शिक्षणासाठी दररोज शेकडो विद्यार्थी या घाटातून पाटणकडे जात असतात. या घाटातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते. सध्या अनेक दरडी धोकादायक स्थितीत आहेत त्यामुळे कधीही येथे मोठी दुर्घटना घडू शकते.
दरड कोसळल्यास जीवितहानी होण्याची शक्यता
ढेबेवाडी-पाटण ही रहदारी सुखकर व्हावी यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे; मात्र या परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने डोंगर खचत आहेत आणि तो भाग घसरून रस्त्यावर येत आहे. डोंगरातून मोठ्या प्रमाणावर पाणी खाली वाहत येते. या पाण्यासोबतच डोंगरातून लहान मोठे दगड कोसळत असतात. त्यावेळी निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन वाहन चालक तसेच प्रवासी सावध असतात; मात्र सध्या पाऊस सुरू असल्याने दरड कधीही कोसळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अचानक दरड कोसळल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कामानिमित्ताने दररोज पाटणला दिवशी घाटातून प्रवास करावा लागतो. घाटातून वाहन चालवताना काळजाचा ठोकाच चुकतो कधी एकदाचा घाट संपतोय असे वाटते. या घाटातील वेडीवाकडी वळणे तसेच पडत असलेल्या दरडी आणि अरुंद रस्ता यामुळे भीती वाटते. अनेकवेळा समोरून येणारे वाहन दिसत नाही. - नंदकुमार पाटील, प्रवासी, मंदुळकोळे खुर्द