‘ढेरपोटे’ पोलीस वाढले; अनिश्चित वेळेत कसे राेखणार आरोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:46 AM2021-09-09T04:46:50+5:302021-09-09T04:46:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पोलिसांच्या ड्युटीची वेळ निश्चित नसल्यामुळे त्यांच्या आराेग्यावरही परिणाम होतोय. कधी दिवसा तर कधी रात्रीची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पोलिसांच्या ड्युटीची वेळ निश्चित नसल्यामुळे त्यांच्या आराेग्यावरही परिणाम होतोय. कधी दिवसा तर कधी रात्रीची ड्युटी. जेवण वेळेवर नाहीच, शिवाय विश्रांतीही पुरेशी नाही. यामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडलंय. पोटाचा घेर वाढून वजनही वाढलंय. अशी परिस्थिती असताना तंदुरुस्त कसे राहतील, असा प्रश्न उपस्थित होतोय.
पोलिसांनी फिट राहावं, यासाठी फिट प्रमाणपत्र देणाऱ्या पोलिसांना दरमहा अडीचशे रुपये दिले जातात, जेणेकरून पोलिसांना आपला फिटनेस ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, या हेतूनं हा अडीचशे रुपयांचा भत्ता दिला जातो. हा भत्ता पूर्वी अनेक पोलीस कर्मचारी घ्यायचे. त्याचे कारण म्हणजे खासगी रुग्णालयामधील फिटनेस प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात होते. मात्र, आता खासगी दवाखान्याचे रद्द करण्यात आले असून, शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. सिव्हिलमध्ये फिटनेस प्रमाणपत्र घेताना सर्व तपासण्या केल्या जाणार, यामुळे खरे प्रमाणपत्र मिळणार. त्यामुळे इथले प्रमाणपत्र घेण्यापेक्षा अडीचशे रुपयेच नको, अशी मानसिकता अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची झाल्याचे दिसून येते.
चाैकट : एकही अर्ज नाही
जिल्हा शासकीय रुग्णालयात फिटनेस प्रमाणपत्र घेण्यासाठी एकही अर्ज आला नसल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. सिव्हिलमधील रुग्णांची गर्दी, वेळेवर तपासणी होईल की नाही, याची साशंकता. त्यामुळे अनेक पोलीस फिटनेस प्रमाणपत्र घेण्यासाठी जात नाहीत. केवळ आजारी रजेवरून कामावर हजर होताना प्रमाणपत्र द्यावे लागते. याच प्रमाणपत्रासाठी पोलीस सिव्हिलमध्ये जात आहेत.
चाैकट : जेवणालाही वेळ नाही...
कोट :
तसं पाहिलं तर आम्हाला ड्युटी कुठे लागेल, याची शाश्वती नसते. जेवण तर अजिबात वेळेवर होत नाही. त्यामुळे पित्ताचा त्रास प्रचंड होतो. रात्री बारा वाजता कामावरून घरी गेल्यानंतर आम्ही जेवतो. एकंदरीत जेवणाची वेळ निश्चित नाही. त्यामुळे आमचं आरोग्य बिघडतंय.
- डी. पी. जाधव, पोलीस कर्मचारी
कोट : वजन वाढू नये म्हणून व्यायाम केला पाहिजे, हे खरं आहे. पण रात्रीची ड्युटी असली की दुसऱ्या दिवशी व्यायामाला जाता येत नाही. आठवड्यातून एक दोनदा तरी ड्युटी बदलत राहते. शिवाय बंदोबस्तही असतो. त्यामुळे व्यायामाला वेळ मिळत नाही. परिणामी फिटनेस पूर्वीसारखा राहात नाही.
- एन. के .माने, पोलीस कर्मचारी
चाैकट : कसे राखणार आरोग्य..
आम्हाला आठ तास ड्युटी असेल तर काही प्राॅब्लेम नाही. परंतु बंदाेबस्त करून कंटाळवाणे वाटते. आमची नोकरी आहे म्हटल्यावर आम्हाला काम करणे भागच आहे. पण आमचाही विचार व्हायला हवा. अनेक कर्मचाऱ्यांना डायबेटीस, हृदयरोग, मूत्रपिंडाच्या तक्रारी जाणवत आहेत. केवळ अवेळी जेवण आणि पुरेसी विश्रांती नसल्यामुळेच पोलिसांचे आरोग्य बिघडत असल्याचे खुद्द पोलिसांचेच म्हणणे आहे.
कोट : पोलिसांची ड्युटीच अशी असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वेळेनुसार रोज थोडा तरी व्यायाम करणे गरजेचे आहे. आपला फिटनेस चांगला असेल तर आपले कामही चांगले होते.
- सजन हंकारे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका