पश्चिम भागात धो-धो, साताऱ्यात जोरदार : कोयनेतून ५५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 02:17 PM2020-08-17T14:17:08+5:302020-08-17T14:18:50+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस सुरूच असून सोमवारी सकाळपर्यंत कोयनेला १२३, नवजा येथे १७४ आणि महाबळेश्वरला १८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे कोयनेतील साठा ९२ टीएमसीवर गेला आहे. त्यातच धरणाचे ६ दरवाजे १० फुटांनी उचलून विसर्ग सुरू आहे. सकाळी कोयनेतून ५५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस सुरूच असून सोमवारी सकाळपर्यंत कोयनेला १२३, नवजा येथे १७४ आणि महाबळेश्वरला १८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे कोयनेतील साठा ९२ टीएमसीवर गेला आहे. त्यातच धरणाचे ६ दरवाजे १० फुटांनी उचलून विसर्ग सुरू आहे. सकाळी कोयनेतून ५५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.
सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १२३ तर जूनपासून आतापर्यंत ३४४४ मिलिमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला १८१ आणि आतापर्यंत ३८८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला सकाळपर्यंत १७४ आणि आतापर्यंत ३९३५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
सकाळी ८ च्या सुमारास कोयना धरणात १ लाख १४ हजार ९८० क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर धरणाचे ६ दरवाजे १० फुटांवर होते. या दरवाजातून ५३५८८ क्यूसेक पाणी सोडण्यात येत होते.
हे सर्व पाणी कोयना नदीपात्रात जात होते. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. परिणामी कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोयना धरणात ९२.३८ टीएमसी इतका पाणीसाठा होता. दरम्यान, सोमवारी सातारा शहर व परिसरात सकाळी ढगाळ हवामान झाले होते. मात्र, दुपारी जोरदार पाऊस झाला.