धुळोबा यात्रेत २५ मुलांना झेलले
By Admin | Published: March 12, 2015 09:59 PM2015-03-12T21:59:23+5:302015-03-12T23:55:50+5:30
नाडोलीत उत्साहाला उधाण : राज्यभरातील भाविकांची हजेरी
मल्हारपेठ : पश्चिम महाराष्ट्राचे व धनगर समाजाचे कुलदैवत असणाऱ्या नाडोलीच्या धुळोबाची यात्रा देवाच्या भाकणूक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडली. या यात्रेत परंपरेनुसार लहान पंचवीस मुलांना देवळाच्या छतावरून सोडून खाली झोळीमध्ये झेलण्यात आले. नाडोली, ता. पाटण येथे मूळस्थानक म्हणून धुळेश्वर देवाच्या उगमस्थानाची आख्यायिकाआहे. धनगर समाजातील हुबाले कुटुंब १५० वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यात विस्थापित झालेले. हुबालेवाडी, वडगाव, तडवळे, म्हसवड, भवानीनगर व पाटण तालुक्यातील सांगवड गावचे कुलदैवत म्हणून धुळोबा देवस्थान आहे. सांगली जिल्ह्यातील बहे-हुबालेवाडी ग्रामस्थांकडून यात्रा भरवली जाते. होळी दिवशी सासनकाठीसह पालखी निघते. हुबालेवाडी, बहे, कासेगाव, आटके, कराड, विहे, मल्हारपेठ या मार्गावरून पंचमी दिवशी नाडोलीच्या धुळोबा मंदिर परिसरातील धार्मिक विधीसाठी सज्ज राहते. समाजातील जाणकर मानकरी संपूर्ण वर्षाची शेळ्या, मेंढ्या, गुरंढोरं व शेतीपीक पाण्याची परिस्थिती कशी असेल याची भाकणूक सांगतो. बुधवारी याच यात्रेत नवसाची लहान मुले, श्रद्धेने देवळाच्या छातावरून खाली सोडतात व त्यांनी खाली झेलले जाते.कापडी झोळीतून अलगद उचलून घेऊन नवस पूर्ण करून घेतात. त्याप्रमाणे आजही यात्रा, धार्मिक विधी व परंपरेनुसार उत्साहात पार
पडली. (वार्ताहर)