Satara: धोम-बलकवडी कालव्याला भगदाड!, लाखो लिटर पाणी वाया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 03:55 PM2024-08-26T15:55:58+5:302024-08-26T15:56:28+5:30
कामाच्या गुणवत्तेबाबत साशंकता!
खंडाळा : ‘धोम-बलकवडी कालवा खंडाळा तालुक्यातून वाहत असून, अजनुज ते असवलीदरम्यान असणाऱ्या खिंडीत धोम-बलकवडी कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या कालव्याला भगदाड पडल्याने कालव्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
खंडाळा तालुक्याच्या माथ्यावरील दुष्काळी कलंक पुसण्यासाठी धोम-बलकवडी कालवा जीवनदायी ठरला आहे. सध्या या कालव्याद्वारे पुराचे अतिरिक्त पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील विविध ठिकाणची छोटे-मोठे तलाव, बंधारे भरणे शक्य झाले आहे. गेल्या दोन दिवसांत खंडाळा तालुक्यासह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. धरणाचे पाणी कालव्यालाही असल्याने हा कालवा भरून वाहत आहे. अजनुज ते असवलीदरम्यान असलेल्या खिंडीतील गेट क्रमांक अकरा जवळील भागात कालवा फुटल्याने मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाऊ लागले आहे.
कालव्याला अस्तरीकरण असताना भगदाड पडले, त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कालव्याला भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी या भागातील माळरानातून शिवारात पोहोचले. अनेक ठिकाणी हे पाणी चालू पिकांमध्ये घुसल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. कालव्याचे भगदाड तातडीने बंद करून पाण्याचा विसर्ग पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.