धोम-बलकवडीचे पाणी फलटण तालुक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:44 AM2021-08-12T04:44:18+5:302021-08-12T04:44:18+5:30
आदर्की : पाटण, महाबळेश्वर, कऱ्हाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर आला, तर फलटण तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे ...
आदर्की : पाटण, महाबळेश्वर, कऱ्हाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर आला, तर फलटण तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे नदीला वाहून जाणारे पाणी कालव्याद्वारे फलटण तालुक्यात सोडण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत धरण व्यवस्थापनाने धोम-बलकवडी कालव्यात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण, कऱ्हाड, जावळी, महाबळेश्वर तालुक्यात यंदा पावसाने तांडव घातले. गेल्या अनेक दशकांत झाला नाही असा पाऊस जुलै महिन्यात झाला अन् नद्यांना महापूर आला. धोम, धोम-बलकवडी धरणे भरल्यानंतर धरणातील पाण्याचा नदीत विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला. हेच पाणी नदीत सोडण्याऐवजी धोम-बलकवडी कालव्यात सोडल्यास फलटण तालुक्यात दुष्काळी तालुक्याला मोठा दिलासा मिळेल, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांमधून केली जात होती. याबाबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत मंगळवारी धाेम-बलकवडी कालव्यात पाणी सोडण्यात आले अन् शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
फलटण तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील बाजरी, मका, मूग, घेवडा, पावटा आदी पिके धोक्यात आली होती. तर पाण्याअभावी ऊसाच्या लागणी रखडल्या होत्या. विहिरीचे पाणी कमी झाल्याने पाणीटंचाईचे संकटही निर्माण झाले होते. मात्र, आता कालव्यात पाणी आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
(कोट)
सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला धोधो पाऊस पडतो. मात्र, पूर्व भागातील फलटण तालुक्यात पावसाचा एकही थेंब नसतो. कालव्यात पाणी सोडल्याने आता खरीप हंगामातील पिकांना उभारी मिळणार आहे.
- संतोष शिंदे, माजी उपसरपंच कोऱ्हाले
फोटो : १० धोम-बलकवडी
धोम धरणातून मंगळवारी धोम-बलकवडी उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)